महाबळेश्वर : महापुरुषाच्या पुतळ्याला हार घालण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादानंतर माजी नगरसेविका श्रद्धा रोकडे यांच्या कुटुंबीयांना तलवार, पाइप व हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी माजी नगरसेवक कुमार शिंदे (वय ३८), बंधू योगेश शिंदे (४५, दोघे. रा.महाबळेश्वर) यांच्यासह १८ जणांवर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माजी नगरसेविका श्रद्धा रोकडे यांचे पती उमेश रोकडे आपल्या सहकाऱ्यांसोबत सोमवारी सकाळी महापुरुषाच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी गेले होते. सर्वांनी मिळून पुतळ्याला हार घातल्याने, तेथे उपस्थित असलेले कुमार शिंदे, योगेश शिंदे यांना ते आवडले नाही. यानंतर, उमेश रोकडे व त्यांचे कुटुंबीय वाहनाने महाड येथे महापुरुषाच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी निघून गेले. या ठिकाणी योगेश शिंदेही आले. येथे शिंदे व रोकडे कुटुंबीयांत वादावादी झाली. यानंतर, योगेश शिंदे हे उमेश रोकडे यांना ‘तू वरती भेट, तुला दाखवतो’ अशी धमकी देऊन निघून गेले.महाड येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर रोकडे कुटुंबीय आपल्या चारचाकी वाहनाने महाबळेश्वरकडे परतले. त्यांच्यामागे उमेश रोकडे यांचे वडील रमेश रोकडे व मामा दीपक भट दुचाकीवरून येत होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटातून मेटतळे गावाजवळ येताच, योगेश शिंदे याने आपले चारचाकी वाहन आडवे लावून रोकडे यांच्या वाहनाचा रस्ता अडविला. यानंतर, योगेश शिंदे, बबलू पार्टे व अनोखळी व्यक्तींनी दुचाकीवरील दीपक भट व रमेश रोकडे यांना मारहाण सुरू केली. उमेश रोकडे व त्यांची आई मीरा रोकडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आली.यावेळी कुमार शिंदे यांनी तलवारीच्या साह्याने दीपक भट यांच्या पोटावर व मांडीवर, तर मीरा रोकडे यांच्या तोंडावर वार करून जखमी केले. पीव्हीसी पाइप, हॉकी स्टिकने मारहाण केल्यानंतर कुमार व योगेश शिंदे यांचे सहकारी घटनास्थळावरून पळून गेले, असे उमेश रोकडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.उमेश रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश शिंदे, कुमार शिंदे, बबलू पार्टे, संजय शिंदे (सर्व रा.महाबळेश्वर) यांच्यासह एकूण १८ जणांविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप भागवत हे करीत आहेत.शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्तमारहाणीत दीपक भट व मीरा रोकडे गंभीर जखमी झाले, तर उमेश रोकडे व योगेश शिंदे यांनाही दुखापत झाली. गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर महाबळेश्वरात तणाव निर्माण झाला असून, सुरक्षेसाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Satara Crime: महापुरुषाच्या पुतळ्याला हार घालण्याच्या कारणावरून वाद, माजी नगरसेविकेच्या कुटुंबावर तलवार हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 1:27 PM