सातारा : ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि काश्मीरच्या प्रश्नापेक्षा मोठा खासदार उदयनराजेंच्या चित्राचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:चं चित्र सातारा शहरातील भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावर काढावं. म्हणजे ते महामार्गावरूनही दिसेल. तसेच याचा निर्णय आता राज्यसभाच घेईल असे वाटते,’ असा जोरदार टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर जोरदार हल्लाबोल केला. साताऱ्यातील एका इमारतीच्या भिंतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे चित्र रेखाटायचे आहे. यासाठी पोलिसांनी मनाई केल्यानंतर वाद तसेच तणाव वाढला. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी या कृतीवर जोरदार आसूड ओढला.आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, धूलिवंदनाच्या निमित्ताने साताऱ्यात नवीन विषय सुरू झाला आहे. हा निव्वळ बालिशपणा आहे. कारण, खासदार उदयनराजेंनी नुकताच वाढदिवस साजरा केलाय. त्यांची ६० वर्षांच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे साठी बुद्धी नाठी म्हणतात तसा हा प्रकार आहे. खासदारांनी आपल्या कार्यकर्त्याला आवर घालावा. कारण, समर्थक नेत्यांच्या पुढे-पुढे करून स्वत:चा स्वार्थ साधतात. त्यामुळे उदयनराजेंनी कार्यकर्त्यांचे किती ऐकावे हेही महत्त्वाचे आहे. त्यातच विकासकामे होत नसतील तर त्यांनी रस्त्यावर उतरावे.
उदयनराजेंच्या भित्तीचित्रावरील वाद सीमावादापेक्षा गहन प्रश्न, शिवेंद्रसिंहराजेंचा टोला
By नितीन काळेल | Published: March 07, 2023 7:47 PM