सातारा : ‘सत्ताधारी न्यायव्यवस्था त्यांच्यासाठी सोयीस्करपणे वापरतात, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात,’ असे विधान ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले (नाशिक) यांनी सातारा येथे बोलताना केले. न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी राज्यसरकार, सीबीआय यंत्रणा कशी वागत आहे? हे स्पष्ट करून न्यायव्यवस्था पोखरली जात असल्याचेही ते म्हणाले.
सातारा येथील परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सातारा पाठक भवनमध्ये ‘भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचे भवितव्य’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोेलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर होते. विचारमंचावर विजय मांडके, जयंत उथळे होते.न्यायव्यवस्था व सत्ताधारी यांच्या अभद्र व हितसंबंधी आता जनतेनेच बोलले पाहिजे. जनतेने गप्प राहू नये. बोलला नाहीतर जिवंत राहिला काय, किंवा मेला काय तुमचा काय उपयोग? लोकशाही व न्यायव्यवस्था रक्षणाची जबाबदारी जनतेइतकीच माध्यमांची आहे. माध्यमांनी सत्य बाहेर आणले पाहिजे.
सर्वोच्य न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची घुसपूस सांगितली. माझ्यासह देशातील बहुसंख्य जनतेने त्यांचे स्वागत केले. भारतीय लोकशाहीसाठी हे स्वागतार्ह आहे. मात्र, त्यांची व सरन्यायाधीशांची बैठक झाल्यानंतर या न्यायाधीशांचे समाधान झाल्याने ते पुन्हा कामावर हजर झाले. त्या बैठकीत काय झाले? काय ठरले? हे जनतेला कळले पाहिजे, असेही निरंजन टकले यांनी सांगितले.यावेळी निरंजन टकले यांनी न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण, मालेगाव स्फोट प्रकरण, बर्ड फ्ल्यू प्रकरण, कोपर्डी प्रकरण यासंदर्भात सत्ताधारी व तपास यंत्रणा न्यायव्यवस्था यांच्या हस्तक्षेपाविषयी धक्कादायक माहिती सांगितली. भारतीय लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया यासंदर्भातही त्यांनी माहिती दिली. भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेपुढे जर जनतेने लक्ष दिले नाही तर गंभीर आव्हान उभे राहू शकते, असेही ते म्हणाले. जयंत उठले यांनी प्रास्ताविक केले. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर, अरुण गोडबोले, डॉ. प्रसन्न दाभोलकर, डॉ. सुहास पोळ, डॉ. राजश्री देशपांडे, कॉ. किरण माने, कॉ. वसंतराव नलावडे, कॉ. भगवानराव भोसले, राजेंद्र गलांडे, रणजित भोसले, मिनाज सैयद, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ आदी उपस्थित होते.सातारा येथे आयोजित व्याखानात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान झाले. यावेळी विजय मांडके, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, जयंत उथळे उपस्थित होते.