सातारा : जिल्हा नियोजनमधून सातारा पोलीस दलासाठी निधी मिळाल्यानंतर सोमवारी तब्बल ७४ वाहने जिल्हा पोलीस दलात तैनात झाली. दरम्यान, मोठ्या संख्येने वाहने मिळाल्याने पोलिसांच्या कामकाजात गतिमानता येणार आहे.
पोलीस परेड मैदानावर सोमवारी दुपारी वाहने प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.
जिल्हा नियोजनमधून सातारा पोलीस दलासाठी निधी मिळाला आहे. पोलिसांना तपासासाठी, गस्तीसाठी प्रामुख्याने चांगल्या वाहनांची नितांत गरज असते. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने जिल्हा नियोजनातून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. याला मंत्री व लोकप्रतिनिधी यांची साथ मिळाल्याने त्यानुसार निधीला मान्यता मिळाली.
चारच दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पोलीस दलासाठी ५९ लॅपटॉप, ४० संगणक, ४० प्रिंटर अशी खरेदी करण्यात आली. या साहित्याचे वितरणही करण्यात आले आहे.
जिल्हा नियोजनमधील निधीच्या दुसर्या टप्प्यात सोमवारी खरेदी केलेल्या वाहनांचे लोकप्रतिनिधींच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वाहनांमध्ये स्कॉर्पिओ १३, बोलेरो ५, इर्टिगा २, पोलीस पिंजरा व्हॅन ६ व ४८ दुचाकींचा समावेश आहे. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : जावेद खान