सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असला तरी कोयना धरण परिसरात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धरणात ८८.७६ टीएमसी इतका साठा झाला आहे. तर जिल्ह्यातील माण आणि खटाव या तालुक्यांसाठी वरदान ठरणारे उरमोडी धरण ८६.२१ टक्के इतके भरले आहे. कण्हेर धरणातही चांगला पाणीसाठा आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत २५ दिवस पाऊस पडत होता. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम-बलकवडी आदी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.
कोयनानगर येथे शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३७१७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सध्या धरणाचा दरवाजा व पायथा वीजगृहातील विसर्ग बंद झाला आहे.
शनिवारी सकाळी आठपर्यंत कोयना धरणात ८८.७६ टीएमसी पाणीसाठा होता. तर धरण ८४.३३ टक्के इतके भरले आहे. धोम धरण ८४.७७ टक्के, कण्हेर ८२.११, बलकवडी ८५.७६, उरमोडी ८६.२१ तर तारळी धरण ८५.२४ टक्के इतके भरले आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ०१ (४८६)कोयना ९१ (३७१७)बलकवडी ३३ (१८७६)कण्हेर ०४ (५८०)उरमोडी ०७ (८९३ )तारळी १४ (१६३२)