कऱ्हाड : ‘देशाच्या इतिहासात महाराष्ट्रातील सहकार चळवळीने आदर्श निर्माण केला आहे, इतर राज्यात झालेल्या घोटाळ्यांमुळे सहकार चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन संशयाचा आहे. सहकार चळवळ ही समाजसेवेचे व आर्थिक विकासाचे माध्यम आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ व सागरी वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
येथील जनकल्याण पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘जनकल्याण गौरव पुरस्कार’ मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या येथील एहसास संस्थेस शनिवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष मिलिंद पेंढारकर, संचालक सीए शिरीष गोडबोले, अनिरुद्ध देशपांडे, डॉ. प्रकाश सप्रे, दिलीप येळगावकर यांची उपस्थिती होती.
मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘जनकल्याण पतसंस्थेने पंचवीस वर्षांत वाटचाल करत असताना प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. संस्थेचे हे कार्य कौतुकास्पद आहे. सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात. मात्र, त्यावर मात करीत अनेक संस्था यशस्वी झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था, क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहेत. त्यांच्या यशामागे फार मोठा इतिहास आहे. देशाच्या इतिहासात महाराष्ट्रातील सहकार चळवळीने फार मोठा आदर्श निर्माण केला आहे. पण दिल्लीमध्ये सहकाराबद्दलचा प्रभाव जेवढा चांगले असायला पाहिजे होता, तेवढा चांगला नाही. देशाच्या अन्य राज्यांमध्ये सहकारामध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. त्यामुळे सहकार चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयाचा आहे. सहकार चळवळ निकोप राहण्याचा संबंध कशाशी आहे, हे सर्वार्थाने शोधण्याची गरज आहे. सहकार क्षेत्र म्हणजे राजकारणाचा धंदा नाही. सहकार क्षेत्राची जबाबदारी ही त्या संस्थेत काम करणाऱ्या अध्यक्ष व संचालकांवर अवलंबून असते. त्यांच्यावरच त्या संस्थेची प्रगती अवलंबून असते. त्यामुळे पैसा कुठे कमवायचा आणि कुठे नाही कमवायचा हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.’
चंद्रशेखर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. शिरीष गोडबोले यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष मिलिंद पेंढारकर यांनी संस्थेची पार्श्वभूमी सांगितली. डॉ. प्रकाश सप्रे यांनी आभार मानले.
- चौकट
‘जनकल्याण’चे यश आनंददायी !
सहकार क्षेत्रात काम करत असताना जनकल्याण पतसंस्थेने आजवर मिळवलेले यश निश्चितच आनंद देणारे आहे. काही कार्यक्रमांमधून आपल्याला शिकायला मिळत असते. म्हणून इच्छा नसली तरी मी अनेक कार्यक्रमांना जात असतो. जे मला शक्य झाले नाही ते शेखर चरेगावकर यांनी करून दाखवले आहे, असे गौरवोद्गारही मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी काढले.
फोटो : २५केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड येथे शनिवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जनकल्याण पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘जनकल्याण गौरव पुरस्कार’ एहसास संस्थेस प्रदान करण्यात आला.