म्हसवड : सर्वसामान्य माणसांना कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी समन्वय साधून काटेकोरपणे प्रयत्न करण्याच्या सूचना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, मालोजीराव देशमुख, प्रमोद दीक्षित, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, खटावचे गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, डॉ. युन्नूस शेख, मंडलाधिकारी, माण-खटावमधील अधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी सूर्यवंशी म्हणाले, ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याने प्रशासनच जबाबदार आहे. कोरोना टेस्टसाठी विरोध करणाऱ्यांना टेस्ट करण्यासाठी भाग पाडावे. सध्या सर्वत्र बेडची वाणवा आहे. त्यानुसार अत्यावश्यक रुग्णांना बेड मिळावा, यासाठी उपाययोजना करावी लागेल. भविष्यातील उपाययोजनांसाठी गावागावातील हॉल, शाळाची पाहणी करून ठेवावेत. कंटेन्मेंट झोनमधील सर्वांची दर तीन दिवसांनी आरोग्य तपासणी करावी. अंगणवाडी सेविकांना मास्क, फेसमास्क, सॅनिटायझर,ग्लोव्हज इतर सुरक्षेची साधने आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावीत.
जिल्ह्याच्या तुलनेत माणमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण सर्वात कमी आहे. ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्या कार्यरत नाहीत. त्यांना पुन्हा चालना द्यावी. हॉटस्पॉटच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ व मालोजीराव देशमुख यांनी सांगितले.