कोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद वर्चस्व असलेल्या कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदि अजय कदम (पिंपोडे खुर्द) यांची तर सभापतिपदि गुलाबराव जगताप (रणदुल्लाबाद) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी म्हणून वडूजच्या सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रीती काळे यांनी काम पाहिले. मंगळवारी सकाळी संचालक, आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी जमले. समितीचे मार्गदर्शक संचालक बाळासाहेब सोळस्कर-पाटील यांनी मुंबईत असलेल्या आ. शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधल्यानंतर सभापतिपदि अजय कदम व उपसभापतिपदि गुलाबराव जगताप यांची निवड करण्याचा निर्णय त्यांनी सांगितला. अध्यासी अधिकारी प्रीती काळे यांनी निवड प्रक्रिया सुरु केल्यानंतर सभापतिपदासाठी अजय कदम व उपसभापतिपदासाठी गुलाबराव जगताप यांनी अर्ज दाखल केले. केवळ दोघांचे अर्ज आल्याने सर्व सोपस्कर पूर्ण करुन त्यांची निवड झाल्याचे काळे यांनी जाहीर केले. बाजार समिती आवारात फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शाहूराज फाळके, तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजी भोईटे यांनी पुष्पहार घालून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)
कोरेगाव बाजार समितीच्या सभापतीपदि अजय कदम
By admin | Published: September 15, 2015 11:45 PM