तांबवे : येथील काही व्यापारी व ग्रामस्थ कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे काही दुकाने तसेच बाजारपेठेत काही भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. एका डॉक्टरवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सरपंच शोभा शिंदे व उपसरपंच विजयसिंह पाटील यांनी केले आहे.
खरिपाची तयारी
कोपर्डे हवेली : परिसरात रब्बी हंगामानंतर रिकाम्या झालेल्या शेतांच्या मशागतीच्या कामात शेतकरी मग्न आहेत. परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी उसाचा खोडवा गेल्यानंतर शेतीची नांगरटीची कामे सुरू केली आहेत. शाळूपिकाची काढणीही अंतिम टप्प्यात आली आहे. जून महिन्यात पेरणी किंवा उसाची लागण करणाऱ्यांसाठी शेताच्या मशागतीची कामे करण्यात परिसरातील शेतकरी व्यस्त आहेत.
झाडांची देखभाल
पाटण : सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मोरगिरी ते नाटोशी रस्त्यानजीक लावलेल्या झाडांची देखभाल करण्याचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्यालगत लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देणे, आजूबाजूचे गवत काढणे, झाडांना खड्डे काढण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झाडांची वाढ चांगली झाली आहे.
नाल्यांची दुर्दशा
मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. त्याचे सर्वाधिकार याच विभागाकडे आहेत. मात्र, नालेनिर्मितीपासून एकदाही या नाल्यांची साफसफाई केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.