संजय जाधव, पैठण नाथसागर जलाशयात (जायकवाडी प्रकल्प) सध्या पक्ष्यांचे अधिवेशन भरले आहे. यंदा या जलाशयावर गतवर्षीपेक्षा जास्त संख्येने विविध देशी-विदेशी पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. पक्ष्यांचे आगमन तब्बल महिनाभर लांबल्याने काळजीत पडलेल्या पक्षीमित्रांना मात्र, यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या आठवड्यात पक्षी जगताचे आकर्षण ठरलेल्या फ्लेमिंगोचेही जलाशयावर आगमन झाल्याने नाथसागरात बहार आली आहे. आगमन झालेल्या पक्ष्यांच्या हालचाली व सुरेल आवाजाच्या प्रभावाने परिसरातील प्रसन्नता वाढली आहे.निसर्गाची किमया व पक्ष्यांची दुनिया जवळून अनुभवयाची असल्यास सध्या नाथसागरसारखे दुसरे ठिकाण नाही. हजारो देशी-विदेशी पक्ष्यांच्या सहवासात राहताना एका वेगळ्या विश्वातील स्वर्गीय आनंद पक्षीमित्रांना याठिकाणी प्राप्त होतो आहे. गेल्या ३० वर्षांत येथे समृद्ध असे पक्षी जगताचे अस्तित्व निर्माण झाले असल्याने आॅक्टोबर ते मार्चदरम्यान पक्षीमित्रांची पावले आपसुकच नाथसागराकडे वळतात.नाथसागराचा विस्तीर्ण पाणपसारा व उथळ खोलीमुळे १९७८ पासूनचे विदेशी पक्षी येथे हजेरी लावत आहेत. भरपूर दलदल, बेट, वालुकामय भाग, आजूबाजूला असलेली दाट झाडी, स्थलांतरित पक्ष्यांना लागणारे खेकडे, मासे व जलवनस्पती येथे मोठ्या प्रमाणात मिळते. मध्य युरोप, लडाख, तिबेट, सैबेरिया, कच्छ, दक्षिण रशिया या विदेशातील पक्ष्यांचा नाथसागरावर आॅक्टोबर ते मार्च असा मुक्काम असतो. साधारणपणे पक्षी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून येण्यास सुरुवात होते. सँडपायपर व स्टिल्ट या पक्ष्यांचे आगमन सर्वप्रथम झाले. त्यानंतर टफ्टेड पोचार्ड, कॉमन टिल्स, ग्रीन शॉक, सीगल, प्लव्हर, डनलिन, प्रँटीन किल, फ्लेमिंगो यांचे आगमन झाले आहे. काही प्रमाणात डेमायझल क्रेन्सचे थवे येण्यास प्रारंभ झाला आहे. यासह टफ्टेड पोचार्ड, कूट पक्ष्यांची संख्या हजारोत असल्याने नाथसागरावरील पक्ष्यांच्या हिवाळी अधिवेशनाची कोरमपूर्ती झाली आहे. येत्या आठ दिवसांत उरले-सुरले सर्वच पक्षी येथे दाखल झालेले असतील, असे पक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले.शेतकऱ्यांचा मित्र व शुभ मानला जाणारा नीलकंठ पक्षी. पिकांवरील किडे याचे मुख्य खाद्य आहे. याशिवाय बुलबुल, मैना, पोपट, होले (हुलगे) व हुप्पी हे पक्षी आढळून येतात. या पक्ष्यांच्या दर्शनासाठी जायकवाडीचे विश्रामगृह परिसर, संत ज्ञानेश्वर उद्यान आदी भागांत वेळ घालवावा लागतो.जलाशयावर फ्लेमिंगो, टफ्टेड पोचार्ड, गडवाल, पीनटेल, कूट, चक्रवाक, जलाशयाच्या काठाकाठाने करकोचे, ओपन बील स्टॉर्क, व्हाइट आयबीस, ब्लॅक आयबीस, रेड रॉन्क, ग्रीन रॉन्क आदी पक्षी हजारोच्या संख्येने जलक्रीडा करताना पाहणे विलोभनीय आहे.पक्ष्यांची भुरळ घालणारी दुनियारोहित ऊर्फ फ्लेमिंगो... नाथसागरावर सर्वात लोकप्रिय असलेला पक्षी म्हणजे रोहित पक्षी होय. यास नाथसागराचा दागिना, भूषण असे गौरविण्यात आले आहे. राजहंसासारखा रुबाबदार दिसणारा, साडेचार फूट उंची लाभलेला व ‘ड’ या अक्षराप्रमाणे मानेचा आकार असलेला, पांढऱ्या शुभ्र फ्लेमिंगोच्या पंखाखाली असलेली गुलाबी पिसे त्याच्या सौंदर्यात भर घालतात. एखादे विमान उड्डाण करण्यासाठी धावपट्टीवर धावते व नंतर उड्डाण घेते अगदी तसेच हे पक्षी पाण्यावर धावत-धावत बरेच अंतर कापतात व नंतर उड्डाण करतात. भारद्वाज पक्षी... याचे दर्शन शुभ मानले जाते. याशिवाय लहान आकाराचा रॉबीन, टेलर बर्ड (शिंपी) पक्षी आपले घरटे असे काही विणतो की ते एखाद्या शिंप्यानेच शिवून दिले असावे. म्हणून यास टेलर बर्ड या नावाने ओळखले जाते. फुलटोच्या ऊर्फ रानबर्ड फुलांचा मध वेचताना पाहणे तर वेडा राघू ऊर्फ ग्रीन बी ईटर त्याच्यासाठी मधमाशाची शिकार करताना पाहणे मोठे रोमांचकारी ठरते. कोतवाल पक्षी... छोट्या आकाराचा कोतवाल पक्षी जेव्हा हद्दीत येणाऱ्या मोठमोठ्या पक्ष्यांना पाठलाग करून हुसकावून लावतो तेव्हा त्याचा संघर्ष प्रेरणादायी वाटतो. खाटकाप्रमाणे, शिकार केलेले टोळ, बेडूक, सरडे झाडाला उलटे टांगून नंतर चवीने ताव मारणारा पक्षी म्हणजे खाटिक पक्षी होय.
पक्ष्यांच्या अधिवेशनाची उशिराने कोरमपूर्ती
By admin | Published: January 17, 2016 11:53 PM