प्रगती जाधव-पाटील- सातारा -शहराचा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असणाऱ्या राजवाडा परिसरात तब्बल पाच रिक्षा थांबे निर्माण झाले आहेत. वास्तविक यातील दोन रिक्षा थांबे अधिकृत तर बाकीचे तीन अनधिकृत आहेत. या अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वाहतुक कोलमडली आहे. राजवाडा परिसरात तब्बल सहा रस्ते आहेत. यातील प्रत्येक रस्ता शहराच्या विविध टोकांकडे जाणारा आहे. याच परिसरात बसस्थानक असल्यामुळे शहर वाहतुकीच्या बसेस आणि बोगद्या बाहेर राहणाऱ्यांसाठीच्या एसटीची वर्दळ याच भागात अधिक असते. त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री नऊ असे बारा तास हा रस्ता वाहन आणि माणसाने भरलेला असतो.काही महिन्यांपासून तीन रिक्षा थांबे सुरू झाले आहेत. राजवाडा चौपाटीशेजारी सुरू असलेला थांबा तर पार्किंगच्या बाहेर असतो. त्यामुळे तिथे संध्याकाळी वाहतुकीची कोंडी होते. याच रस्त्यावर अग्निशामनचे बंबही आहेत. शहरात कुठेही काही वाईट घटना घडली तर या बंबांना जुनी नगर पालिका ते मोती चौक हे अंतर पूर्ण करायलाच दहा मिनिटे लागतील अशी परिस्थिती आहे. राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावर दुकानांची मांडणी, परळी भागात वडाप वाहतुक करणारी वाहने आणि मंडई असे सगळेच एकत्र आहे. याच भागात एक नगर पालिकेची आणि अन्य काही शाळाही आहेत. संध्याकाळी शाळा सुटण्याची वेळ आणि वाहतुकीची वर्दळ एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांनाही जिव मुठीत घेवून चालावे लागते. मुख्या चौकात पाचशे फुटांच्या परिसरातच सुमारे पाच रिक्षा थांबे असल्यामुळे वाहतुकीबरोबरच वर्दळीलाही मर्यादा येत आहेत. संबंधित विभागाने तातडीने याविषयी खबरदारीची पाऊले उचलून या अनधिकृत रिक्षा थांब्याच्या बंदोबस्ताची गरज आहे. अन्यथा भविष्यात त्यांची संख्या वाढणार आहे. केवळ दोन थांबेच अधिकृत सातारा शहराची वाढ लक्षात घेता पूर्वी एकच थांबा येथे मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर वाढती लोकसंख्या आणि रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे राजवाडा परिसरात अजून एक थांबा मंजूर करण्यात आला आहे. राजवाडा परिसरात केवळ दोन रिक्षा थांबेच अधिकृत आहेत. यातील एक थांबा राजवाडा बस थांब्याच्या समोर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पोवईनाका, शाहूपुरी आणि मुख्य बसस्थानक परिसरात शेअर रिक्षा सुरू असतात. तर दुसरा थांबा राजवाडा समर्थ मंदिर रस्त्यावर आहे. या थांब्यावरून समर्थ मंदिर, बोगदा आणि परळी खोऱ्यात जाण्यासाठी लोक जमा होतात. येथेही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी लोकांचा राबता सकाळपासूनच राहतो.
कॉर्नर कॉर्नर पे लिखा है रिक्षा का नाम!
By admin | Published: July 10, 2015 10:20 PM