तरडगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाधित रुग्णास कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी जागा मिळणे अवघड झाले आहे. अशातच मृत्यूचा आकडा वाढत असल्याने धडकी भरत आहे. बाधित रुग्णाला जागेअभावी घरीच होम क्वारंटाईन केले जात आहे. त्यातच कोरोना बाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने डोकेदुखी वाढत आहे.
सध्या सर्वत्र कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात देखीलही दुसरी लाट जोर धरू लागली आहे. तरी देखील सर्वसामान्य अजून गंभीर झाले नसल्याचे दिसत आहे. बरेचसे नागरिक मास्कचा वापर टाळत आहेत. गर्दी करून विनाकारण एकाच ठिकाणी बराच वेळ गप्पा मारल्या जात आहेत. अशाने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडून कोरोनाची संख्या वाढण्यास मदत होत आहे.
हे कमी आहे की काय म्हणून आता तर चक्क घरीच क्वारंटाईन असलेले बाधित व्यक्ती घराबाहेर पडत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्याने बाधित रुग्ण अन ठणठणीत व्यक्ती कोण, हा प्रश्न सर्वांनाच बुचकळ्यात टाकत आहे. हे वेळीच रोखण्यासाठी यावर अंमलबजावणी होणे आवश्यक बनले आहे. यासाठी प्रत्येक गावातील ग्रामदक्षता कमिटी, पदाधिकारी यांनी बाधित व्यक्ती घराबाहेर दिसणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.
संबंधित कोरोना बाधित व्यक्तीने आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची जाणीव ठेवत क्वारंटाईनचा कालावधी संपेपर्यंत घरातच बसून राहणे सर्वांच्या हिताचे बनले आहे. त्यानुसार आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने गावच्या भल्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात सध्या काही गावांमधील शाळांमधून कोरोनाबाधित व्यक्तीची लोकसहभागातून प्राथमिक राहण्याची सोय केली जात आहे. हे स्वागतार्ह आहे. तशाच पद्धतीने इतर गावांनीदेखील स्वतंत्र राहण्याची सोय नसलेल्या बाधितांसाठी अशा प्रकारे सोय केल्यास कोरोनाच्या वाढत्या आकड्यावर अंकुश ठेवण्यास मदत होऊ शकते.
चौकट -
तरडगावात ध्वनिक्षेपकामधून सूचना
दोन दिवसांपूर्वी गावात घरीच होम क्वारंटाईन असलेल्या काही कोरोनाबाधित व्यक्ती घराबाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्यांनी अशा व्यक्तींना समक्ष भेटून घराबाहेर पडू नका, अशी समज दिली. त्यानंतर आता ध्वनिक्षेपकाद्वारे अशा समज दिलेल्या व्यक्ती पुन्हा घराबाहेर फिरताना आढळल्यास योग्य कारवाई केली जाईल, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत.