जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना आणखीनच तीव्र स्वरूप धारण करीत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र स्वरूपाची आहे. दोन हजारांच्या घरात रुग्ण रोज वाढत आहेत. साखळी कशी तोडायची हे प्रशासनासमोर आव्हान असले तरी केवळ कोरोना बाधित आणि आरोग्य विभाग एवढ्यावर हा प्रश्न मिटत नाही. वाढत्या रुग्ण संख्येबरोबर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांना रात्रीचा दिवस करावा लागतोय. घरात एकटेच ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मर्यादित कुटुंब व्यवस्थेतील नवरा-बायको दोघेही बाधित असतील तर अशावेळी इंजेक्शन कोण पुरविणार ही अडचण निर्माण होते. प्रशासन सर्वच पातळीवर पुरेल अशी अपेक्षाही ठेवणे योग्य नाही. तेव्हा सामाजिक संघटनांनी स्वतःचे नेटवर्क तयार केले तर या रुग्णांना वेळीच योग्य मदत मिळण्यास मदत होऊ शकते.
बदलत्या काळानुसार कुटुंबे छोटी होत गेली आहेत. पती, पत्नी दोघे बाधित असतील तर त्यांच्या लहान मुलांचे काय करायचे? त्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेकांचे नातेवाईक दूर जिल्ह्यात असतील तर जोडपे अनेकदा धोका पत्करून बाळाला जवळ ठेवतात. बाधित आई-वडील बेडरूममध्ये तर लहान मुले हॉलमध्ये थांबत आहेत. आईबाप आणि मुलांमधील सर्वांना दुःखदायक असते. मुलांना हॉलमध्येच सात-आठ दिवस ठेवण्याची वेळ येत आहे. अशा आई-वडिलांना कोरोनापेक्षा मुलांचा विरह आणि त्यांचे हाल याचा जास्त त्रास होतो. अशा संकटात सामाजिक संघटनांनी महाविद्यालयीन तरुणींची मदत घेऊन काही दिवसांसाठी मुलांचे पालकत्व स्वीकारले तर आई-वडिलांचा निम्मा आजार कुठल्या कुठे पळून जाईल आणि त्यावर मात करणे सोपे जाणार आहे.
ग्रामीण भागातून अनेकदा रुग्णांसोबत नातेवाईक येतात. रुग्णाच्या खाण्यापिण्याची सोय दवाखान्यातून होते. मात्र, नातेवाईकांच्या पोटाचे हाल होतात. बाहेर लाॅकडाऊन असल्याने हॉटेलमध्ये जेवता येत नाही. अशा प्रसंगी साताऱ्यातील रोटरी क्लब, देवस्थान ट्रस्टनी पुढाकार घेऊन अन्नदानाचा उपक्रम राबविल्याची गरज आहे.
चौकट
समुपदेशनातून मानसिक आधार
वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन होत आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. सरकारी नोकरदार सोडले तर खासगी क्षेत्रातील सर्वांच्याच डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. माझे, माझ्या कुटुंबाचे भविष्यात काय होईल, ही चिंता प्रत्येकाला सतावत आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांची फळी तयार होणे गरजेचे आहे. अशा बेरोजगार तरुणांचे समुपदेशन करून त्यांच्यात पॉझिटिव्हिटी तयार करण्याची गरज आहे.