दहीवडी : दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता माण व खटाव तालुक्यातील सर्व ग्राम समित्या पुन्हा सक्रिय कराव्यात. पुन्हा एकदा दुकानदारांना नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगावे, जिल्ह्यातून व परराज्यातून येणाऱ्यांची माहिती घेणे, कन्टेटमेंट झोन तयार करणे यासह सर्व सूचना माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी सर्व शासकीय विभागांना पत्राद्वारे दिल्या.
गेली दोन महिने कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प झाली होती. परंतु नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका व लग्नसराईसह विविध कारणांनी कोरोनाची संख्या वाढत चालल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता, माण व खटाव तालुक्यातील ग्रामीण, शहरी भागात कोरोना संक्रमण रुग्णांची आकडेवारी कमी करणे व आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशानुसार दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करणे आवश्यक आहे. ग्रामस्तरीय समितत्यांकडून पूर्वीप्रमाणेच बाहेरील जिल्ह्यातून, परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीची माहिती, त्याचे थर्मलस्कॅनिंग करून तापमानाची नोंद तसेच ऑक्सिमीटरमधील आकडेवारी यांची नोद करून ठेवावी. कोविड १९ बाधित रुग्णांच्या घराचा परिसर मायक्रो कन्टेटमेंट झोन तयार करणे व त्याची अंमलबजावणी ग्रामस्तरीय समिती व नगरपालिका, नगरपंचायत कार्यक्षेत्र मुख्याधिकारी यांनी करावी, तसेच रुग्णांची वर्गवारी करून पुढील उपचाराची जबाबदारी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी यांची आहे. कॉन्टेक्ट ट्रेसिंगसाठी मुख्याधिकारी, ग्रामस्तरीय समिती, पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांनी एकत्रित कामकाज करण्याचे आहे. येत्या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे. ग्रामीण व शहरी भागात सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. ग्रामीण व शहरी भागामध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांचा यावर आसणा-या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक करावे, सूचनांचे काटेकोर पालन करावे. भविष्यात कोरोना रुग्णाची आकडेवारी आटोक्यात राहण्यासाठी उपायोजना करण्यात याव्यात, असे आदेश सर्व प्रशासकीय कार्यालयांना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिले.
चौकट..
तिसऱ्या वेळेस उल्लंघन झाल्यास
तीन दिवसांसाठी दुकान बंद
सर्व ग्रामीण व शहरी भागातील सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर आहे तेथे नाकावर व तोंडावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींना ५०० रु. दंड आकारणी करावी. तसेच दुकानांमध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे व पाचपेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करावी. आदेशाचे ग्रामीण भागात उल्लंघन झाल्यास ५०० रुपये दंड आकारावा व दुसऱ्या वेळेस उल्लंघन झाल्यास १००० दंड आकारावा. तिसऱ्या वेळेस उल्लंघन झाल्यास तीन दिवसांसाठी दुकान बंद ठेवावे. तसेच शहरी भागात उल्लंघन झाल्यास १००० रु. दंड आकारावा व दुसऱ्यावेळेस उल्लंघन झालेस २००० रुपये दंड आकारावा. तिसऱ्या वेळेस उल्लंघन झाल्यास तीन दिवसांसाठी दुकान बंद ठवले जाणार आहे.