खटाव : खातगुण (ता. खटाव) येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या राजे पीरसाहेब बागसवार यांचा दिनांक ४ ते ७ एप्रिल या कालावधीत साजरा होणारा उरूस रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, शासनाच्या आदेशाचे पालन करत उरुस रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.
उरुसच्या अनुषंगाने उरुस यात्रा कमिटी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांची पुसेगाव पोलीस ठाण्यात बैठक झाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने यात्रा, उत्सव याबाबत दिलेल्या सूचनांची माहिती दिली. यात्रा, उत्सवांवर बंदी असल्याने गावात दुकाने लागणार नाहीत तसेच कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, याची जबाबदारी ग्रामपंचायत तसेच यात्रा कमिटीची असून, शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांना दर्शनासाठी दर्गा दिनांक ४ ते ७ एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कोरोना अनुषंगाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून धार्मिक विधी पार पाडण्यात येतील, असे सांगितले. या बैठकीला उपसरपंच यशवंत लावंड, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी लावंड, सुनील लावंड, संजय पवार व पदाधिकारी उपस्थित होते.
२५खटाव
कॅप्शन : खातगुण येथील राजे बागसवार याच्या उरुस संदर्भात पदाधिकाऱ्यांना शासनाच्या नियमांची सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी माहिती दिली.