अंगापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वर्षपूर्तीनंतरही दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केला आहे. कोरोनाचा धोका विचारात घेऊन व प्रशासनाच्या आदेशान्वये सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत ऐवार्जीनाथ वार्षिक यात्रेत केवळ मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून साजरी करण्यात येणार आहे. अन्य सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.
कोरोनो आजाराची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वच सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा तसेच विविध गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर अंगापूर वंदन ग्रामस्थांचे ग्रामदैवत ऐवार्जीनाथ वार्षिक यात्रा ४ व ५ एप्रिल रोजी होत आहे. यात्रेच्या अनुषंगाने ऐवार्जीनाथ सभामंडपात ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ग्रामपंचायत पदाधिकारी, सातारकर वाशीय ऐवार्जीनाथ चॅरिटेबल ट्रस्ट तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या आजाराची वर्षपूर्तीनंतरही तीव्रता वाढत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली. यामुळे हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही धार्मिक विधी वगळता यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर अन्य महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी यात्राकाळात पैपाहुण्यांना निमंत्रित करू नये. तसे आढळून आल्यास स्थानिक नागरिकांना एक हजार रुपये दंड तर येणाऱ्या पाहुण्यांना मानसी दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीच्या करण्यात येणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.
दोन दिवस चालणारी यात्रा ही संपूर्ण शाकाहारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा साध्या पध्दतीने साजरी केली जाणार असल्याने ग्रामस्थांची आर्थिक बचत होणार आहे. यातून काही ठरावीक रक्कम नागरिकांच्या सहभागातून नव्याने होत असलेल्या ऐवार्जीनाथ देवालयातील मेघडंबरीच्या कामासाठी तसेच वैकुंठरथाच्या कामासाठी जमा करून विधायक कार्यास सढळ हताने देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
विधायक कामाचा संकल्प..
अंगापूरवासिय पुणेकर निवासी व स्थानिक ग्रामस्थांच्या संकल्पनेतून ग्रामदैवत ऐवार्जीनाथ देवालयात नक्षीदार सागवाणी मेघडंबरी व श्रीची मूर्ती चांदीने अलंकृत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर अंगापूरवासिय सातारकर निवासी ऐवार्जीनाथ चॅरिटेबल ट्रस्ट व अंगापूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून वैकुंठरथ व शिवनाथ स्मशानभूमी सुशोभिकरणाचे काम ही दोन्ही कामे लोकसहभागातून यात्रा बचतीच्या खर्चातून सुरू आहे.