लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या माध्यमातून १०० बेडच्या कोरोना केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा लोणंद नगरपंचायतीच्या प्रशासक संगीता चौगुले-राजापूरकर व मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली.
कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंद येथील मुलींच्या वसतिगृहामध्ये १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. शासनामार्फत होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे जे रुग्ण पाॅझिटिव्ह असणार आहेत व ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना या ठिकाणी आयसोलेट होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. याकामी नागरिकांनी नगरपंचायतीस सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, प्रशासनास कारवाई करण्याबाबत ठोस पावले उचलावी लागतील.
कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेत अनेक तरुणांना व नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हजारो लोक कोरोनाबाधित होत असल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांत शासनास होम आयसोलेशन बंद करण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश असल्याने यापुढे होम आयसोलेट होता येणार नसून सक्तीने विलगीकरण कक्षातच उपचार घ्यावे लागणार आहेत. या कोविड सेंटरला लोणंद मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स विनामूल्य सेवा देणार असून या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
लोणंदकरांनी कोरोनाबाबतीत असणा-या नियमावलीचे तंतोतंत पालन केल्यास आपण व आपले कुटुंबीय सुरक्षित राहणार आहोत. प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवणे, या त्रिसूत्रीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. नगरपंचायतीमार्फत या कोविड सेंटरला लागणाऱ्या आवश्यक बाबींसाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.