सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी ८०४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून, २५ बाधितांचा मृत्यू झाला. सातारा आणि कऱ्हाड तालुक्यांतील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र अजून देखील थांबलेले नाही.सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख ९५ हजार ९४ इतकी झाली असून, बाधितांच्या मृत्यूचा आकडा ४ हजार ३४ झालेला आहे.
सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यांतील बाधितांची संख्या पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. शुक्रवारी कऱ्हाड तालुक्यात २५९ तर सातारा तालुक्यात १३४ नवे बाधित आढळून आलेले आहेत. खटाव तालुक्यात देखील बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमध्ये बाधित आढळून येत आहेत.कऱ्हाड तालुक्यात आत्तापर्यंत ८३३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर शुक्रवारी नऊ जणांना जीव गमवावा लागला. सातारा तालुक्यातील रुग्णांची संख्या ४० हजार ८१४ इतकी झाली असून, शुक्रवारी आठ बाधितांच्या मृत्यू झाला. या तालुक्यात एकूण १ हजार २४७ बाधितांना जीव गमवावा लागला आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, त्यांचे मृत्यूदेखील थांबवणे प्रशासनाला शक्य झालेले नाही अन् दुसरीकडे जिल्ह्यातील निर्बंध उठवले असल्याने बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रावर देखील लोकांची मोठी गर्दी असते, यातून रुग्णसंख्या वाढण्याची भीती देखील मोठी आहे.जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ६२७ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ९६ हजार ७७३ इतक्या तपासण्या करण्यात आल्या त्यातून १ लाख ९५ हजार ९४ रुग्ण आढळले तर १ लाख ८२ हजार १५० रुग्ण कोरनामुक्त झाले. ९ हजार ८३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.म्यूकरमायकोसिस बाधित एकाचा मृत्यूजिल्ह्यात म्यूकरमायकोसिस व्याधीग्रस्त १ रुग्ण नव्याने आढळला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्याधीने आतापर्यंत १६६ लोकांना बाधा झाली. ९३ जण या व्याधीतून बरे झाले. म्यूकरमायकोसिसमुळे आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.