वाई
कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने गेल्या दीड वर्षापासून देशभरामध्ये लॉकडाऊन असल्याने याचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. यातूनही काहींचे व्यवसाय पुढच्या टप्प्यात सुरू होतील व त्यातून मागील तूट भरून काढता येईल. मात्र, गेल्या दीड वर्षापासून अडचणीत असलेल्या संगणक, टायपिंग व व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण संस्थांना ही संधी मिळण्याची शक्यता नाही. संगणक संस्थांच्या उन्हाळी सुट्टीतील क्लासच्या नियोजनावरच वर्षभराचा डोलारा या संस्था सांभाळतात. त्यांचा उन्हाळी सुट्टीचा क्लास लॉकडाऊन झाल्याने या व्यावसायिक संस्थांचे कंबरडेच मोडले आहे.
जिल्ह्यातील शेकडो संगणक टायपिंग व व्यवसाय शिक्षण संस्थांना याचा फटका बसला आहे. या क्षेत्राचा या दीड वर्षात लाखो रुपयांचा व्यवसाय बुडाला असून आता यामधून कसे बाहेर यायचे याचीच भीती या संस्था संगणक संस्थाचालकांना आहे.
या संस्थामधून मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणारे अगदी अल्प कालावधीपासून १ ते ३ महिन्यांपर्यंतचे अभ्यासक्रम वर्षभर शिकवले जातात. या संस्थांना दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या की, सुट्टीच्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये कोर्सेसला चांगला प्रतिसाद मिळत असतो. जून, जुलैपासून विविध करिअर कोर्सच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते. त्या माध्यमातून या संस्थांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.
जिल्ह्यातील संगणक संस्थांमधून उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये सुमारे १५ ते २० हजार विद्यार्थी तीन महिन्यांसाठी प्रशिक्षण घेतात. जून, जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही हजारोंच्या घरात आहे. याबरोबर जिल्ह्यात ९५ मान्यताप्राप्त संगणक टायपिंग संस्था असून अठरा ते वीस हजार विद्यार्थी जानेवारी ते जूनच्या बॅचमध्ये असतात. या संस्थांना सहा ते आठ कोटींचा फटका बसणार आहे. यातील बहुतांशी संस्थाचालक बँका, पतसंस्थांमधून कर्ज काढून आपल्या संस्था चालवीत असून संस्था चालू नसल्याने आर्थिक नियोजन कसे करायचे, असा प्रश्न संस्थाचालकांसमोर आहे. यामुळे संस्थाचालक हतबल झाले असून आता पुढे वर्षभर कशा पद्धतीने जगायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळातच आता संस्थेमध्ये खूप कमी विद्यार्थी आहेत. तरीही कोरोनाच्या नियमाचे पालन करून संस्था चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संस्थाचालकांकडून केली जात आहे.
चौकट
जिल्ह्यात एमएससीआयटी शिक्षण
देणाऱ्या १८० प्रशिक्षण संस्था
टायपिंग प्रशिक्षण - ९५
व्यवसाय शिक्षण ४८
शॉर्टहँणड व इतर ३७
ट्रिपल सी व अन्य कौशल्य अभ्यासक्रम - १५० हून अधिक चौकट
कोट :- संगणक संस्थांना पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असतो. ट्रेनिंग संस्थांचे आर्थिक गणित उन्हाळी बॅचवर असल्याने व गेली दीड वर्षे कोरोना संकटामुळे संस्था बंद असल्यामुळे मोठा आर्थिक फटका संस्थाचालकांना बसत असून शासनाने यामधून काहीतरी मार्ग काढावा.
सतीश जेबले - संगणक संस्थाचालक, वाई
कोट :- कोरोनामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे अभ्यासक्रम केल्यास विद्यार्थ्यांना नोकरी व कंपन्यांना प्रशिक्षित कामगार मिळत असतात. तरी शासनाने कोरोनाचे नियम पाळून जुलै महिन्यापासून प्रवेश व प्रशिक्षणाची परवानगी दिल्यास शेकडो संस्थाचालकांना दिलासा मिळेल.
चंद्रशेखर शिंदे - व्यवसाय शिक्षण संस्थाचालक, सातारा.