जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी प्रशासन काम करत आहे. मात्र तरीही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी येणाऱ्या काळात रुग्णांना बेड अपुरे पडू नयेत म्हणून गतवर्षी कोरोना कमी झाल्यानंतर बंद पडलेली सेंटर सुरू करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. गतवर्षी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने शहरातील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय हॉलमध्ये कोरोना सेंटर सुरू करण्यात आले होते. काही महिने हे सेंटर सुरू होते. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सेंटर बंद करण्यात आले. सध्या बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बहुद्देशीय हॉलमध्ये पुन्हा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी या सेंटरमध्ये बेड आणण्यात आले आहेत. लवकरच अन्य कामे सुरू करून येथे पन्नास बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सेंटरमधील अन्य सुविधा पुन्हा नव्याने करण्यात येणार आहेत. महसूल प्रशासनाच्यावतीने हे सेंटर सुरू होत आहे. हे सेंटर पूर्ण झाल्यानंतर गरज भासल्यास तालुक्यातील अन्य बंद असलेली सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.