फलटण : ‘कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेची कोणतीही तयारी आणि आरोग्य सुविधांची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. दुसरी लाट भयानक असल्याने भाजपच्या प्रत्येक आमदार, खासदारांना शंभर बेडचे कोरोना हॉस्पिटल काढायला सांगितले. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी वडिलांच्या नावाने सुरू केलेले कोरोना सेंटर राज्याला दिशादर्शक ठरेल,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
फलटण येथे लोकनेते दिवंगत हिंदूराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटरच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, डॉ. प्रवीण आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टर व कोरोना केअर सेंटरची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासते. पहिली लाट गेल्यानंतर लसीकरण सुरू झाले; परंतु लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरविली. मोठ्या प्रमाणावर लसीकरण न झाल्याने दुसरी लाट प्रचंड वेगाने आली. ही दुसरी लाट ओसरल्यानंतर सुद्धा आपण रिलॅक्स होऊन चालणार नाही. कुठलाही आजार कधीही संपत नसल्याचे स्पष्ट करीत आता उभी केलेली कोरोना केअर सेंटर काही दिवसांनी ओस पडली तरी ती बंद करून चालणार नाही. दुसरी लाट गेल्यावर तिसरी लाट येणार नाही, असे कोणालाही सांगता येणार नाही’.
रणजितसिंह म्हणाले, ‘फलटण तालुक्यामध्ये रोज चारशे रुग्ण नव्याने दाखल होत असल्याने त्यांना पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरू करणे गरजेचे झाले होते. माढा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायझर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही उपलब्ध करून दिले आहे.’
आमदार गोरे म्हणाले, ‘नेमके कोरोनाचे संकट किती दिवस राहणार आहे, हे आपल्याला माहीत नाही. सरकारी व खाजगी रुग्णालये आता कमी पडत आहेत. गरीब माणूस खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. लसीकरण केंद्रावर शेजारच्या जिल्ह्यातील नागरिक येऊन लस घेऊन जात असल्याचे निदर्शनास आणून देत राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे लसीकरणामध्ये अनेक त्रुटी आहेत. लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. राज्य सरकारने त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.’
जयकुमार शिंदे यांचेही यावेळी भाषण झाले. शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक अनुप शहा यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक अशोकराव जाधव यांनी आभार मानले.
१३फलटण-कोरोना
फलटण येथे लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.