तळबीडमध्ये चंद्रसेन महाराज विलगीकरण कक्ष सुरू आहे. विनामूल्य सेवा मिळत असल्याने हा कक्ष गरीब व गरजूंसाठी आधार ठरला आहे. गावात कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाच्या नियमांचे पालन करून गावाने कोरोनाला हद्दपार केले. सध्याच्या दुसऱ्या लाटेत शर्थीचे प्रयत्न करूनही येथील शंभरहून अधिक ग्रामस्थांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे तळबीडचे ग्रामस्थ हादरून गेले होते. आजही अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचा विचार करून ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेत तीस बेडचा विलगीकरण कक्ष सुरू केला. त्यासाठी लोकवर्गणीचीही मदत झाली. सध्या कोरोना रुग्णांसाठी तेथे नाष्टा, जेवणासह वैद्यकीय सेवा-सुविध देण्यात येतात. त्यासाठी उंब्रज आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार व त्यांचे सहकारी कार्यरत आहेत.
तळबीडमधील ग्रामस्थांनी उभारलेला चंद्रसेन कोविड कक्षाचा निर्णय कौतुकास्पद आहे. त्याचा रुग्णांना चांगला फायदा होत आहे. या कक्षासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी दिले आहे.