लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : एकीकडे कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना आणि दुसरीकडे मृत्यूचे तांडवही थांबेना, अशी द्विधा परिस्थिती सध्या सातारा जिल्ह्याची झाली आहे. कोरोनाग्रस्तांनी ७५ हजारांचा टप्पा ओलांडला असताना गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. हा आकडा सर्वांचीच चिंता वाढवणारा आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, असे असले तरी गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक झाला आहे. दिनांक १ एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल साडेनऊ हजार नवे रुग्ण आढळले असून, जवळपास शंभर रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात बाधित रुग्ण सापडण्याचे व मृत्यूचे सत्र गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. डिसेंबरनंतर जिल्ह्यात रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी आले होते. मात्र, मार्च महिना सुरू झाल्यापासून परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. सातारा जिल्ह्यात वर्षभरात तब्बल सात ७६ हजार ३६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६४ हजार ५६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर २ हजार ६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मृत्यूंचे प्रमाण वाढले असून, चिंतेचे ढग अधिकच गडद होऊ लागले आहेत.
(चौकट)
१५५० मृतांचे पालिकेने स्वीकारले पालकत्व
सातारा पालिकेने कोरोना प्रतिबंधासाठी रूपरेषा आखली असून, प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे. स्वच्छतेपासून ते कोरोनामुळे दगावलेल्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत प्रशासनाने पथके तयार केली आहेत. पालिकेच्या पथकाने वर्षभरात तब्बल १,५५० मृतांवर अंत्यसंस्कार करून आपले दायित्व पूर्ण केले आहे. अंत्यसंस्काराचे काम अत्यंत जोखमीचे आहे, तरीही कर्मचाऱ्यांचा आरोग्यपूर्ण लढा अविरतपणे सुरूच आहे.
(चौकट)
पुणे, सोलापूरनंतर सातारा आघाडीवर
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर पाठोपाठ सातारा जिल्ह्याचा मृत्यूदर अधिक आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ५,८५६, सोलापूर २,१५८, सातारा २,००६, सांगली १,८६२ तर कोल्हापूर जिल्ह्यात १,८२८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(चौकट)
सातारा @ ५१२
कोरोनाबाधित व मृतांमध्ये सातारा तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या १८,४१३ इतकी असून, आतापर्यंत तब्बल ५१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी २७ रुग्ण कोरोनाने दगावले असून, ही बाब या तालुक्यासाठी दिलासादायी आहे.
(चौकट)
तालुकानिहाय मृत्यू असे
जावळी ७३
कऱ्हाड ३५५
खंडाळा ७६
खटाव १७६
कोरेगाव १७७
माण १२६
महाबळेश्वर २७
फलटण १७६
पाटण १२३
सातारा ५१२
वाई १६०