वाठार स्टेशन :
कोरोना लस कधी येणार याची गेली वर्षभराची संपूर्ण जगाला लागलेली प्रतीक्षा अखेर संपली असून, आता कोरोना लस ग्रामीण भागात खेडोपाड्यात दाखल झाली आहे. मात्र या लसीबाबत सध्या मोठे गैरसमज पसरल्याने ग्रामीण भागात या लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या ग्रामीण भागातील नागरिकांत कोरोना परवडला; मात्र लस नको, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
गेली वर्षभर कोरोना महामारीने ग्रामीण भागासह संपूर्ण देश हतबल झाला आहे. या रोगाबाबत लवकर लस उपलब्ध व्हावी, यासाठी जगभरात देशभरात मोठे प्रयत्न सुरू होते. अखेर या आजाराबाबतीत लस शोधण्यात आपल्या देशाला यश मिळाले असून, सध्या पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार आदींना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल, अशा लोकांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी ही लस देण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या लसीबाबतीत ग्रामीण भागात मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत, ही लस घेतल्यानंतर तीन दिवस ताप येतो. हात दुखतो असे, या बाबतीत गैरसमज पसरत असल्याने आता लस दारात आली असताना कोरोना परवडला; पण लस नको, अशी भावना सध्या ग्रामीण भागातील लोकांची झाली आहे.
मात्र कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यू होत आहेत.
लसीकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुद्धा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसीकरण करणे जरूरी आहे. यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती आरोग्य विभाग देत आहेत इतर लस प्रमाणेच ही लस असून, प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांनी ही लस तत्काळ घ्यावी, अशी माहिती आरोग्य विभाग देत आहे. या बाबतीत लोकांनी लसीबाबतीत मनात असलेले गैरसमज काढून टाकून लसीकरण मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे.
सध्या प्रत्येक आरोग्य केंद्रात आठवड्यातील तीन दिवस ही लस दिली जात आहे. यासाठी गावोगावी आरोग्यसेविका या बाबतीत माहिती देत आहेत. लस घेण्यासाठी आपले आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.
चौकट..
आजाराला हरविण्यासाठी पुढाकार घ्यावा..
कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, बीसीजी, गोवर सारखीच ही लस आहे. कोणत्याही प्रकारची लस घेतल्यानंतर ती थोडी दुखते तशीच ही पण लस आहे. त्याला घाबरून न जाता लस घेऊन या आजाराला हरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, या लसीकरणानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्वसामान्य दुष्परिणाम साधारणपणे दिसतात. ते
१ ते २ दिवस राहतात. काहींना तर काहीच लक्षणे दिसत नाहीत. काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकारशक्ती कार्यान्वित झाल्याचे लक्षण आहे.
कोट..
लस घ्यायला जाण्यापूर्वी उपाशीपोटी जाऊ नये. जाताना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेऊन जावे. पहिल्या डोस घेतल्यानंतर ४५ दिवसांनंतर रोग प्रतिकारक शक्ती तयार होते; पण त्यासाठी २८ दिवसांनंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.
-डॉ. रुपाली जाधव, आरोग्य अधिकारी, पळशी प्रा. आरोग्य केंद्र