लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या विषाणूंनी सातारा जिल्ह्यातील १३ हून अधिक बालकांचे बाबा हिरावले आहेत. जिल्ह्यात अंगणवाडीसेविकांमार्फत याचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागाकडे अद्यापही दोन्ही पालक गेलेल्या मुलांची नोंद नाही.
कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांचा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या बालकांना न्याय्यहक्क मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. कृती दलाचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे असून, सदस्य म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे कृती दल मुलांना आवश्यक ती मदत देण्यासाठी कार्यरत राहणार आहे.
साताऱ्यात कोरोनाचा विळखा चांगलाच घट्ट बसू लागला आहे. काम आणि व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या पालकांना त्यातही विशेषत: पुरुषांना कोविडची लागण अधिक झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून अशा मुलांची माहिती संकलित केली जात आहे. साताऱ्यात १३ मुलांनी त्यांचे वडील गमावले आहेत. सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने आकडे वाढण्याची शक्यता आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अनेकदा मालमत्तेविषयी वाद निर्माण होतात. याचे निराकरण करण्याचे कामही विभाग करणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल दर १५ दिवसांनी बैठक घेऊन याबाबात कामाचा अहवाल सादर करणार आहे. कृती दलाने मुलांच्या संगोपनासाठी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढे या बालकांना न्याय्य हक्क देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांवर याची सर्वांत मोठी जबाबदारी असणार आहे.
कोट :
साताऱ्यात अद्यापही सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत हेल्पलाइनद्वारे १३ बालकांनी वडील गमावल्याची माहिती पुढे आली आहे. या मुलांना त्यांच्या कोणत्याही हक्कापासून वंचित न ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांविषयी लोकांनी माहिती द्यायला पुढे यावे.
-रोहिणी ढवळे, महिला व बालकल्याण अधिकारी
चौकट :
‘सवयभान’चा मदतीचा हात
जागतिक महामारी असलेल्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी गतवर्षापासून सामान्य सातारकरांपर्यंत पोहोचून त्यांना जागरूक करणाऱ्या सवयभान ग्रुपने अशा बालकांना मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. कोविड महामारीत पालक गमावलेल्या बालकांसाठी ते निश्चित रक्कम फिक्समध्ये टाकणार आहेत. यातून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून मुलांचे संगोपन करण्याचं नियोजन आहे. याबरोबरच साताऱ्यातील काही दानशूर व्यक्तींनी प्रशासनाकडे या मुलांसाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.
प्रशासन काय करणार
कोविडकाळात बाबा गमावलेल्या जिल्ह्यातील १३ मुलांशी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा संवाद साधणार आहे. काका, मावशी, आत्या, मामा हे पालक खरोखरच या मुलांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यात येईल. ते सक्षम नसतील, तर ६ वर्षांवरील मुलांना बालगृहांमध्ये पाठविले जाईल. त्यापेक्षा लहान मुलांना शिशुगृहात ठेवले जाईल, असे चाइल्डलाइनचे रमेश मुळीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
(चौकट)
सर्वेक्षणाचे काम अद्याप सुरूच
कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांच्याकडून ही माहिती महिला व बालविकास अधिकाऱ्यांतर्फे अंगणवाडीसेविकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. गावपातळीवरील ही माहिती संकलित करण्याचे काम अंगणवाडीसेविकांकडे देण्यात आले आहे. त्यांची पाहणी झाल्यानंतर मग प्रत्यक्षातील आकडा समोर येणार आहे.