डोकेदुखी वाढली
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित व मृतांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळीच काळजी घेऊन स्वत:बरोबरच कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन केले आहे. काही जण मास्कचा वापर केवळ शोसाठी करताना पाहायला मिळत आहेत तर काही जणांचा विनामास्क बिनधास्त वावर आहे.
प्लास्टिकचा वापर
सातारा : ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविले जात आहे. तरीही साताऱ्यात बाजारपेठेत खुलेआम प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. यामध्ये फळे विक्रेते, भाजी विक्रेतेही ग्राहकांकडून मागणी नसतानाही प्लास्टिक पिशव्यांमध्ये वस्तू घालून देतात.
झाडे धोकादायक
सातारा : ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी रस्त्याकडेला झाडे आहेत. त्यामुळे वाहतुकीला धोका संभवतो. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन या झाडांचा धोका कमी करून होणाऱ्या धोक्यापासून बचाव करावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
चालकांचा बेशिस्तपणा
सातारा : सातारा शहरातील राजपथावर दुचाकीस्वार बेशिस्तपणे वाहन चालवितात. हात न दाखवता किंवा इंडिकेटर न लावता वाहने अचानक वळवितात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारांचा गोंधळ उडतो. या बाबी साताऱ्यात अपघाताला निमंत्रण देत आहेत.
नळाच्या तोट्या गायब
सातारा : साताऱ्यातील अनेक भागांतील पाण्याच्या नळाच्या तोट्याच गायब झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. सातारकरांना दरवर्षी मार्चपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तरीही अनेक सातारकर पाणी गळती रोखण्यासाठी फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे जाणवत आहे. शहरातील अनेक ठिकाणी नळांना तोट्या बसवल्या गेल्या नसल्याने पाणी वाया जात आहे.
कुत्र्यांची दहशत
सातारा : येथील गुरुवार पेठ, चिमणपुरा पेठ व बोगदा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कुत्री पादचाऱ्यांचा अंगावर धावून जात आहेत. पालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दुरुस्तीची मागणी
सातारा : आणेवाडी टोलनाका ते उडतारे या हद्दीतील सेवारस्ता पूर्णता खचून गेला आहे. त्यामुळे हा सेवारस्ता वाहतुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. तरीही अनेक वाहनचालक सर्कस करीत खचलेल्या सेवा रस्त्याच्या कडेने वाट काढून प्रवास करीत आहेत.
बसस्थानकांमध्ये गर्दी
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. ग्रामीण भागातून खरेदीसाठी लोक साताऱ्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसस्थानकांत गर्दी वाढत आहे. महामंडळाने गाड्या सुरू केल्या असल्या तरी फेऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
नागरिकांना विसर
सातारा : कोरोना कमी झाला आहे; पण संपलेला नाही याचे भानच नागरिकांना राहिले नसून स्वच्छता, मास्क व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा विसर पडू लागला आहे. अनलॉकनंतर जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आले असून, नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण
सातारा : रिक्षा टेम्पोवर ध्वनिक्षेपक लावून कर्णकर्कश आवाजात जाहिरात करणाऱ्या वाहनांमुळे फलटणसह उपनगरांतील नागरिक हैराण झाले आहेत. यावर पोलिसांनी तातडीने मर्यादा आणावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दिवसभर आवाजामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
.............................................
रस्ता मोकळा करा....
सदर बजार येथील भीमाबाई आंबेडकर वसाहतीसमोर रस्त्याकडेलाच बांधकामाच्या मिक्सरच्या गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे येथूज ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
(छाया : जावेद खान)
फोटो :08जावेद खान