लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : यात्रा जत्रांच्यानिमित्ताने अंगात देव येण्याच्या प्रथेला सलग दोन वर्षे कोरोनामुळे ब्रेक मिळाला आहे. चार दशकांच्या प्रबोधनाने जे जमलं नाही, ते कोरोनाच्या लॉकडाऊनने करून दाखवलं. मानसिक आजाराच्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी समाजानेही पुढं येणं महत्वाचं बनलं आहे.
खेडोपाडी यात्रांमध्ये देव अंगात येणाऱ्यांची संख्या बरीच मोठी होती. मनोविकारतज्ज्ञांच्या भाषेत याला ‘कल्चर बाउंड सिंड्रोम’ असं संबोधलं जातं. आशिया खंड आणि त्यातही भारतातच देव अंगात येण्याचे प्रकार घडतात. याला सांस्कृतिक आणि सामाजिक अभिसरणही कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. देवाविषयीची आदरयुक्त भीती समाजमनात अद्यापही आहे. त्यामुळे तो ज्याच्या शरीरात जातो त्याविषयीही भीती निर्माण होते ही त्या मागची भावना असल्याचे मानले जाते.
मानसिक आजाराकडे अद्यापही गांभीर्याने पाहिलं जात नाही. कोरोना काळात सलग दोन वर्षे देव अंगात आले नाहीत, याचा अर्थ अभिव्यक्ती बदलली हा आहे. त्यामुळे समाजानेही या अंगात येणाºया व्यक्तींना व्यक्त होण्याची संधी दिली तर देवीच्या आजारासारखा हाही आजार निघून जाईल यात शंका नाही.
अंगात येण्यात महिलाच आघाडीवर !
पुरुषांपेक्षा महिलांच्या अंगात येण्याचं प्रमाण मोठं आहे. कुटुंबात आणि समाजातही महिलांना व्यक्त व्हायला, मत मांडायला अद्यापही मर्यादा आहेत. त्यामुळे महिलांचा कोंडमारा होता. परिणामी देव संचार विचाराच्या अनुभूतीने त्यांचा मानसिक भावनांचा निचरा होऊन ते त्यांचे दैनंदिन जीवन योग्य पद्धतीने जगतात.
कोणाच्या अंगात येतं?
अंगात येण्याचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक आहे. यात्रांच्या उत्सवात तर वाद्यांच्या आवाजनेही अंगात शक्ती संचारल्याची अनुभूती येते. गावात किंवा कुटुंब पातळीवरही ज्यांना स्वत: कमजोर असल्यासारखं वाटतं, आपण दुर्लक्षित असल्याची भावना ज्यांच्यात असते त्यांच्याच अंगात येतं. यात सामाजिक पातळीवर मान मिळविण्यासाठी पुरुष याचा आसरा घेतात तर कुटुंबातील सन्मान मिळविण्याचं द्वार म्हणून महिला याकडे पाहतात.
ताणाची अभिव्यक्ती बदलली !
लॉकडाऊनमध्ये कुटुंबकलह वाढीस लागल्याचे चित्र शहरी भागात पहायला मिळाले. मात्र, ग्रामीण भागात ताणाची अभिव्यक्ती बदलल्याचाही अनुभव आला. नोकरीसाठी महानगरांमध्ये गेलेल्या पती पश्चात त्याच्या कुटुंबीयांसह गावी राहणाऱ्या पत्नीला पतीचा आधार मिळणं हाही त्यातील सर्वांत मोठा भाग असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
कोट :
मनाने मदत मिळविण्यासाठी मारलेली हाक म्हणजेच अंगात येणं. हा सौम्य स्वरूपाच्या ताणाचं लक्षण मानलं जातं. कोविड काळात यात्रा जत्रांमधील उत्सवांवर मर्यादा आल्याने दरवर्षी अंगात येणाऱ्यांच्या यंदा अंगात आले नाही याचाच अर्थ त्यांनी ताणाची अभिव्यक्ती बदलली आहे.
- डॉ. हमीद दाभोळकर, कार्यकर्ता, अंनिस