लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : कोरोना महामारीचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांनादेखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे दुधाला प्रतिलिटर पाण्याच्या बाटलीएवढा दर मिळत आहे. यामुळे दूध उत्पादक मोठ्या अडचणीत सापडला असून, शेतीला पूरक असलेला हा व्यवसाय मोडकळीस येतो की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वर्षी अनलॉकनंतर दुधाला १८ रुपये प्रतिलिटर दर देण्यात आला. यानंतर यंदा तो २१ ते २३ रुपये झाला आहे, असे असताना स्थानिक पातळीवर पिशवीतून विकल्या जाणाऱ्या दुधाचा दर ४४ रुपये राहिला. खंडाळा तालुक्यातील सहकारी तत्त्वावरील दूध संघ बंद पडल्यामुळे सध्या खासगी दूध संघ चालकांच्या माध्यमातून दुधाची खरेदी होत आहे. सध्या गोविंद, नवनाथ, आनंद या संघांच्या माध्यमातून या तालुक्यात दुधाची खरेदी होत आहे. सर्वच दूध संघांचा खरेदी दर २१ ते २३ रुपये आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे खवा व्यवसाय बंद पडल्याने या भट्ट्यावरील दूधदेखील खासगी संघाकडे वळले आहे. खासगी दूध संघावर निर्बंध नसल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होऊन आर्थिक गळचेपी होत आहे.
(चौकट)
पशुखाद्याचे दर गगनाला..
सध्या सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, सुग्रास या पशुखाद्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे पशुपालकांना दुभत्या जनावरास खुराक घालताना हात आखडता घ्यावा लागत असून, त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे. जनावरांसाठी लागणारा चारा, खुराक याचा सरासरी विचार करता प्रतिलिटर २५ ते २७ रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो. मात्र, दुधाला मिळणारा दर त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय जिवंत ठेवायचा असल्यास शेतीतील इतर पिकांप्रमाणे दुधासदेखील आधारभूत किंमत ३० रुपयांपेक्षा अधिक निश्चित करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
(पाॅइंटर करणे)
खाद्य दर - सरकी पेंड - ४५ रु. किलो, शेंगदाणा पेंड- ६० रु. किलो, सुग्रास खाद्य- २८ ते ३० रु. किलो, कडबा वैरण - २५०० रु. शेकडा, ओली मका - ३००० रु. पांड
(कोट)
शेतीला पूरक असलेला पशुपालन व्यवसाय सध्या धोक्यात आहे. उत्पादन खर्चापेक्षा दुधाला मिळणारा दर खूप कमी आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुधाचे दर वाढले नाहीत तर पशुपालन बंद करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल. त्यामुळे किमान ३० रुपये प्रति लिटर दर मिळावा, ही अपेक्षा आहे.
-सचिन आवारे, दूध व्यावसायिक
.......................................