सातारा: जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा कहर सुरु केला असून सलग दुसऱ्या दिवशीही गुरुवारी कोरोनाचे ३०३ रुग्ण आढळून आल्याने सातारकर आणि जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरून गेले आहे.जिल्ह्यात बुधवारी चोवीस तासांमध्ये ३०८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही कोरोना बाधितांची संख्या तीनशे पार झाल्याने प्रशासन आणखीनच चिंतेत पडले आहे. एकीकडे कोरोना लसीकरणासाठी वेग वाढवण्यात आला आहे तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळतेय.
कोरोनाची लाट नेमकी कशी आटोक्यात आणायची असा प्रश्न आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाला पडला आहे. यावर एकच उपाय आरोग्य विभागाकडून सुचवला जात असून लसीचा वेग आणखी वाढून दिवसाला पंचवीस ते तीस हजार जणांना लस देण्याची सुविधा तयार करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे. तरच ही लाट आटोक्यात येईल.
लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यासाठी शासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. गतवर्षी सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे यंदा ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही लस उपलब्ध केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.दरम्यान कोरोना बाधितांची संख्या ६१ हजार ६३५ वर पोहोचली आहे. हा आकडा आता कुठपर्यंत पोहोचतोय याची धास्ती आता प्रशासनाला लागली आहे.