सातारा : घरातील सदस्याला साधी सर्दी जरी झाली तरी नातेवाईक त्या सदस्याची पुरेपूर काळजी घेतात. मात्र आज कोरोनाने नाती-गोती अन् मित्रपरिवारात मोठे अंतर निर्माण केले आहे. असाच अनुभव सातारकरांना आला. एका घरातील वृद्धा कोरोना पॉझिटिव्ह असताना नातवाने आपल्याला काही करावे लागू नये, यासाठी तिचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल गायब केला. त्यामुळे प्रशासनाची दिशाभूल झाली. गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला खरा, मात्र उपचारापूर्वीच या वृद्धेची प्राणज्योत मालवली.
कोरोनाने आज सर्वत्र थैमान घातले आहे. या विषाणूमुळे आज कोणाचे मातृछत्र हरपले, तर कोणाचे पितृछत्र. कोणी आपले आजोबा गमावले, तर कोणी आपली आजी. अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष कोरोनाने कायमचा हिरावून घेतला. हे दु:ख भरून न येणारे असले तरी, समाजातील काही विघातक प्रवृत्तीचे लोक घरातील सदस्याला कोरोना झाल्यानंतर त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याऐवजी त्याला वाऱ्यावर सोडून देत आहेत. पुढे तो जगला किंवा नाही, हे देखील पाहिले जात नाही. असाच मनाला चटका लावून जाणारा प्रसंग गुरुवारी साताऱ्यात उघडकीस आला.
एक ६५ वर्षीय वृद्ध महिला साताऱ्यात आपल्या मुलीकडे आली होती. काही दिवसांपूर्वी तिची मुलगी व जावयाला कोरोनाची लागण झाली होती. मुलगी कोरोनामुक्त झाली, मात्र नियतीने घात केला. जावयाचा कोरोनाने मृत्यू झाला. या दु:खातून सावरत असतानाच संबंधित वृद्ध महिलेला देखील कोरोनाची लागण झाली; परंतु कुटुंबियांनी ही बाब सर्वांपासून लपवून ठेवली. तपासणीसाठी घरी आलेल्या वैद्यकीय अधिकारी व आशा सेविकांना देखील त्यांनी खोटी माहिती दिली. वृद्धेला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर तिला घरातून टेरेसवर ठेवण्यात आले. त्याच ठिकाणी तिची देखभाल केली जाऊ लागली. परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे पाहून वृद्धेची एका खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी करण्यात आली असता, चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, भीतीपोटी व आपल्याला काही करावे लागू नये या हेतूने वृद्धेच्या नातवाने तिचा कोरोना अहवाल गायब केला, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. सलग चार-पाच दिवसांपासून वृद्धा अत्यवस्थ असल्याची कुणकुण शेजाऱ्यांना लागली, तेव्हा त्यांनी आपापल्यापरीने वैद्यकीय सेवा पुरविण्याचा व धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र गुरुवारी इमारतीच्या टेरेसवर उपचार घेत असलेल्या वृद्धेची परिस्थिती नाजूक वळणावर आली. शेजाऱ्यांनी कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्र व नगरपालिकेशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. यानंतर पालिका प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली. मात्र वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी घरी जाण्यापूर्वीच वृद्धेची प्राणज्योत मालवली. या वृद्धेचा असा मृत्यू अनेकांना चटका देऊन गेला. पालिकेकडून संबंधित वृध्देवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
(चौकट)
काळजी घ्या, हलगर्जीपणा सोडा
स्वत:च्या व कुटुंबांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करायला हवेत. निष्काळजीपणा सोडून शासन नियमांचे पालन करायला हवे. संकटकाळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. आपण एकमेकांची काळजी घ्यायला हवी, असे केले तरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. आपण एवढे तर नक्कीच करू शकतो.
चौकट
डोळ्यादेखत लोक जाताहेत
कोरोनाची परिस्थिती भयंकर होऊ लागली आहे. लोक शेवटची क्षणी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. एकदा लागण झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार औषधांच्या माध्यमातून कमी करता येतो. पण, त्याला उशीर झाला तर कोणच्याच हातात काहीच राहत नाही. समोर व्यक्ती शेवटच्या घटका मोजत असताना आपण तर नाहीच पण डॉक्टरही काहीच करु शकत नाहीत. यासाठी घरी न थांबता वेळेत रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले पाहिजेत.
आधार आणि आत्मविश्वास हवा
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला एकटे वाटणे स्वाभाविक आहे. अशावेळी त्या व्यक्तीला आधाराची गरज असते. त्यांना आधार देणे आवश्यक आहे. अन्यथा ते खूप खचून जात आहेत. नातेवाईकांनीही एकमेकांना अशा परिस्थितीत आधार देण्याची आवश्यकता आहे. या आधारावरच त्यांचा पुढचा प्रवास अवलंबून आहे. त्यामुळे किमान शाब्दिक आधार या काळात महत्वाचा ठरत आहे. त्यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास वाढून त्याला बरे वाटण्यास मदत होते.