(नियोजनातील विषय आहे)
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : यंदा जिल्ह्यातील १ हजार ३२७ विद्यार्थिनींचा वार्षिक उपस्थिती भत्ता कोरोनाने हिरावून घेतला आहे. त्यात अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींचा समावेश आहे. या विद्यार्थिनी ऑनलाइन उपस्थित आहेत. मात्र, कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्गात उपस्थित नसल्यामुळे त्यांचा वार्षिक भत्ता शासनाकडून स्थगित करण्यात आल्याने त्यांना फटका बसला आहे.
प्राथमिक शाळांमध्ये मुलींची उपस्थिती वाढावी, या उद्देशाने राज्य शासनाने वार्षिक उपस्थिती भत्ता योजना सुरू केली. त्यामध्ये शालेय कामकाजाच्या दिवसांपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त दिवस शाळेत उपस्थित असणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलींना एक रुपया प्रतिदिवस असा एका शैक्षणिक वर्षामध्ये २२० रुपये इतका उपस्थिती भत्ता दिला जातो. जिल्ह्यात गेल्या वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्यरेषेखालील एकूण १३२७ विद्यार्थिनींसाठी एकत्रितपणे २ लाख ६६ हजार इतका भत्ता मंजूर झाला. त्यापैकी २ लाख ६५ हजार ५१० रुपये वितरित केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थिनींसाठीही निधी मंजूर झाला होता. मात्र, कोरोनामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा भरलेल्या नाहीत. त्यामुळे उपस्थिती भत्ता देऊ नये, असे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनींना भत्ता मिळणार नाही. पण, ऑनलाइन वर्गांना उपस्थित असूनही भत्ता मिळणार नसल्याने विद्यार्थिनी, पालकांमध्ये नाराजी आहे.
चौकट
दिवसाला एक रुपया भत्ता
शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दिवसाला एक रुपया भत्ता दिला जायचा. आता तोही बंद झाल्याने या विद्यार्थिनींना मोठा फटका बसणार आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून भत्ता मिळाला नसल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले.
प्रतिक्रिया
कोरोनाच्या कारणावरून या विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद करणे अन्यायकारक आहे. वर्ग भरत नसले, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असून त्यासाठी मोबाइल, रिचार्जचा खर्च होतच आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींना भत्ता द्यावा.
- महारूद्र तिकुंडे, सामाजिक कार्यकर्ते
या वर्षीच्या १३२७ विद्यार्थिनींसाठीच्या उपस्थिती भत्ता योजनेतील रक्कम मंजूर झाली आहे. मात्र, हा उपस्थिती भत्ता स्थगित केल्याचे पत्र शिक्षण संचालकांकडून २२ फेब्रुवारी रोजी मिळाले आहे. यंदा शाळाच न भरल्याने हा भत्ताही देता येणार नाही.
- प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी
काय म्हणतात विद्यार्थिनी?
मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. या भत्त्यामुळे माझ्या शिक्षणाच्या खर्चाला हातभार लागतो. त्यामुळे भत्ता रद्द करू नये.
- कोमल जाधव, इयत्ता तिसरी, शाहूपुरी
गेल्या दोन वर्षांपासून हा भत्ता मिळालेला नाही. थकीत असलेला आणि या वर्षीचादेखील भत्ता मिळावा.
- अनुष्का घाटगे, इयत्ता चौथी, सातारा
आकडेवारी दृष्टिक्षेपात
गेल्या वर्षी भत्ता दिलेल्या विद्यार्थिनी : १३२७
एकूण वितरित केलेली रक्कम : २,६५,५१०
....................