सातारा : गावकी आणि भावकीमध्ये वाटप झाल्याने पाच वर्षांनी येणारी निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा परळी भागातील खडगाव गावाने जपली होती. मात्र, यावेळी कोरोनामुळे गावकऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. तरुण पिढीने निवडणूक पाहिजे यासाठी हट्ट केला आणि अर्ज भरून मुंबईला गेलेल्या एका उमेदवारामुळे गावात निवडणूक लागली. सध्या या निवडणुकीमुळे गावात प्रचाराचा धुरळा उडत आहे. जुनी पिढी आणि नवीन पिढीचे नेतृत्व करणारे यांच्यातील ही लढत रंगतदार ठरत आहे. परळी भागातील अनेक गावांमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांचे समर्थक राजू भोसले यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या नियोजनाप्रमाणे अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये नव्या आणि जुन्या पिढीमध्ये समन्वय साधणे शक्य झाले नाही. त्यामुळे खडगाव सारख्या इतरही गावांमध्ये निवडणूक लागली आहे.
कोरोनाच्या काळात गावांमध्ये अनेक वाद झाले. या वादामुळे गावांमध्ये एकमत राहिले नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही विरोध झाला. निवडणूक लागली आणि मागील वेळी महिला सरपंचांच्या नेतृत्वाखाली असलेली ही ग्रामपंचायत आता नव्या नेतृत्वासाठी रिंगणात उतरली आहे. सात सदस्यांची ग्रामपंचायत असलेल्या या ग्रामपंचायतीतील चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. एक जागा रिक्त राहिली तर दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्यामुळे पॅनल तयार करता आले नाही. मात्र, दोन जागांवर सध्या जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
कोट
कोरोनाच्या काळात आम्ही कमिटीच्या माध्यमातून गावात शांतता रहावी आणि सर्वांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. पण, काही लोकांना घरात थांबून राहणे जमत नव्हते. त्यांच्यासाठी ते अडचणीचे झाले. त्यांनी या नियमांना विरोध केला. नाईलाजास्तव त्यांच्यावरही कारवाई करावी लागली. त्याचा राग आता निवडणुकीच्या निमित्ताने निघत आहे.
निर्मला शिरटावले, माजी सरपंच, खडगाव
कोट
गावात निवडणूक लागू नये, बिनविरोध निवडणूक व्हावी असे अनेकांचे मत होते. मात्र, काहींनी त्याला विरोध केला. विशेषत: तरुण पिढीच्या मनात निवडणूक लावायचे होते. त्यामुळे निवडणूक लावली गेली. पण, यामध्येही कोणाचेही मतभेद न होता निवडणूक पार पडावी अशी अपेक्षा आहे.
श्रीरंग शिरटावले, माजी अध्यक्ष, तंटामुक्ती समिती