लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाबाबत ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करण्यात आल्या असून नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्याकामी पूर्वीसारखीच मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
याबाबत ग्राम समिती कार्यान्वित करण्याबाबत मागील आठवड्यात आदेश काढण्यात आलेले आहेत. या ग्राम समित्यांचे अध्यक्ष सरपंच असून यासमितीने ज्या घरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलेला आहे, अशा घरातील व्यक्तींसाठी आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. तसेच गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही तर त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याबाबत कार्यवाही करावी असे आदेश संबधितांना दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्तांना आवाहन
लसीकरणासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रावर नाव नोंदवून रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लसीकरणासाठी आपले सेंटर निवडावे व त्या दिवशी त्या वेळेला जाऊन लसीकरण करून घ्यावे. ६० वर्षांवरील नागरिकांना सर्वांना लस देत आहोत. तसेच ४५ वर्षांवरील कोमॉर्बीड (व्याधी असणारे) नागरिकांनीही लस देण्यात येत आहे. हे लसीकरण शासनाने टप्प्याटप्प्याने सुरू ठेवले आहे. तसेच आय एल ए , सारी, कोविडची लक्षणे असणाऱ्यांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोविडची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
गृह विलगीकरणात असलेल्यांना सूचना
गृह विलगीकरणामध्ये आपण रुग्णाची स्थिती व रुग्णाच्या घराची स्थिती बघून रुग्णाला गृह विलगीकरणात ठेवत आहोत. १५ मार्चपासून प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये कोरोना केअर सेंटरला सुरुवात केलेली आहे. ज्या रुग्णाची मेडिकल स्थिती व घरी वेगळे राहण्याची व्यवस्था नाही त्या रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. गृह विलगीकरणाची मुभा दिली आहे, त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांपासून त्यांच्या घरातील नातेवाईकांनी काळजी घ्यावी तसेच त्या कुटुंबातील लोकांनीही घरातच थांबावे.
ग्राम दक्षता समित्यांनी सक्रिय व्हावे
ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष गावचे सरपंच असून सदस्य सचिव ग्रामसेवक आहेत. सहअध्यक्ष तलाठी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचा ग्राम दक्षता समितीमध्ये समावेश केलेला आहे. गेल्यावर्षी मार्च, एप्रिलमध्ये ग्राम दक्षता समितीमुळे खूप चांगल्याप्रकारे सतर्कता राहिली होती. यापुढेही ग्राम दक्षता समितीने चांगले काम करावे. या समितीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळया जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्या पूर्ण कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत.