सातारा : जिल्ह्यात कारोनाची दुसरी लाट आली असून १४९२ पैकी १४२५ गावांत संसर्ग झाला आहे. तसेच अजूनही ६७ गावांपासून कोरोना दूर असला तरी, बाधितांचे वेगाने वाढणारे प्रमाण पाहता, इतर गावांतही लवकरच शिरकाव होऊ शकतो अशी स्थिती आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील दुर्गम भागातही कोरोना पोहोचलाय.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जून महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होते. मात्र, जुलै महिन्यानंतर बाधितांचे प्रमाण वेगाने वाढले. दिवसाला ५०० ते ९०० च्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे पहिल्या लाटेत सप्टेंबरअखेरीस जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण ३८ हजारांच्या घरात पोहोचले होते, तर ऑक्टोबरच्या मध्यावर जिल्ह्यातील १२३२ गावांत कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर बाधितांचे प्रमाण कमी होत गेले. मात्र, फेब्रुवारी महिन्यानंतर प्रमाण वाढत गेले. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून जिल्ह्यातील १४२५ गावांत कोरोनाचा संसर्ग पोहोचलाय. तसेच आणखी काही गावांमध्ये तो पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.
चौकट :
जिल्ह्यातील एकूण गावे १४९२
कोरोना रुग्ण असलेली गावे १४२५
कोरोनामुक्त गावे ६७
........................
पुन्हा उपाययोजना सुरू
कोट :
मागील वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीत आम्ही गाव सुरक्षित ठेवले होते. यासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तीस क्वारंटाईन केले जात होते. तसेच गावात जागृती करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे गावापासून कोरोना दूर राहिला. गावात आता प्रथमच कोरोना रुग्ण सापडले आहेत. वेळेत उपाययोजना केल्याने साखळी थांबण्यास मदत होत आहे.
- प्रकाश साळुंखे, सरपंच येराड, ता. पाटण
फोटो दि.२९प्रकाश साळुंखे, येराड मेलवर...
.................
खंडाळा तालुक्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत घाडगेवाडी गाव कोरोनापासून दूर ठेवण्यात यश मिळाले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट गावात पोहोचली. त्यामुळे कोरोनाची साखळी वाढू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. बाधितांचे विलगीकरण केले जात आहे. ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती प्रबोधन करून आधार देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे लवकरच गाव कोरोनामुक्त करू.
- हिरालाल घाडगे, उपसरपंच, घाडगेवाडी, ता. खंडाळा
फोटो दि.२९ हिरालाल घाडगे, घाडगेवाडी
...............
कोरोना संकटाला वर्ष होऊन गेले. पहिल्या टप्प्यात गावापासून कोरोनाला दूर ठेवले. त्यासाठी पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली. गावातील लोकांनी बाहेरच्या गावांशी संपर्क ठेवला नाही. तसेच गावातही इतर कोणी आले नाही. मात्र, आता एक कोरोनाबाधित सापडला असला तरी उपाययोजना सुरू आहेत. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत.
- ज्ञानेश्वर दिघे, माजी सरपंच, माझेरी पुनर्वसन, ता. फलटण
फोटो दि.२९ज्ञानेश्वर दिघे, माझेरी
..............................................
चौकट :
दुसऱ्या लाटेत अनेक गावांत पोहोचला कोरोना...
गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले. सुरुवातीला खंडाळा आणि सातारा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला. पण, त्यानंतर सर्वच तालुक्यात संसर्ग वाढला. पहिल्या लाटेत ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील १४९२ पैकी १२३२ गावांत कोरोना रुग्ण सापडले होते. सध्या १४२५ गावांत बाधित आहेत. यामध्ये फलटण तालुक्यातील माझेरी पुनर्वसन, जाधवनगर, खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी, पाटणमधील येराड येथे दुसऱ्या लाटेत रुग्ण सापडले. तसेच जावळी, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातील काही दुर्गम गावे अजूनही कोरोनापासून दूर आहेत.
.........................................................................