पेट्री : शनिवार, रविवार लॉकडाऊन असतानाही जागतिक वारसास्थळ कासपठार परिसरातील एकीव (ता. जावळी) येथील धबधब्यावर पर्यटक पर्यटनास येत असल्याने धबधब्यावर पर्यटनास आलेल्या पर्यटकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. पर्यटनस्थळे बंद असतानादेखील परिसरात फिरणाऱ्यांची पावले थांबताना दिसत नसून एकीव धबधब्यावर पर्यटकांच्या कोरोना चाचण्या झाल्या. सध्या धबधब्याला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जावळी तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या एकीव धबधब्यावर शनिवारी, रविवारी प्रशासनाच्या वतीने अचानक कोरोना चाचणी करण्यात आली. अचानक होत असलेल्या या कोरोना चाचणीमुळे पर्यटकांची मात्र चांगलीच धांदल उडाली. जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा मंडल अधिकारी व शिबिराचे नोडल अधिकारी एस. व्ही. मुळीक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता पवार व कर्मचारी यांच्या माध्यमातून पर्यटकांच्या ९ आरटीपीसीआर व २८ अँटिजेन टेस्ट अशा दोन्ही टेस्ट करण्यात आल्या.
शनिवार, रविवारचा मुहूर्त साधून अनेकजण कास पठार, वजराई धबधबा, एकीव धबधबा या ठिकाणी पर्यटनास येत आहेत. माॅन्सूनच्या दमदार आगमनाने सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यातच पावसाने उघडीप दिल्याने हिरवाईने परिसर चांगलाच नटला आहे. अशा आल्हाददायक वातावरणात पर्यटनासाठी प्रत्येकजण यायला इच्छुक आहे. कडक लाॅकडाऊनमुळे पर्यटकांना पर्यटनास बंदी आहे. थेट पर्यटनस्थळांवर कोरोना टेस्ट झाल्याने याचा धसका पर्यटकांनी घेतला आहे.
दरम्यान, कुसुंबीचे तलाठी एस. एस. साळुंखे, मेढ्याचे तलाठी एस. ए. सावंत, आरोग्यसेवक एस. वाय. घोलप, प्रदीप पार्टे,आरोग्य सहायक एस. एस. बोधे, पी. आर. चिकणे यांनी परिश्रम घेतले.
कोट..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन असताना देखील धबधबा परिसरात पर्यटक पर्यटनास येत आहेत. शनिवार, रविवारी येथे पर्यटनास आलेल्या पर्यटकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. शनिवारी २८ रॅट व ९ आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. वीकेंड लॉकडाऊनला पर्यटकांची कोरोना टेस्ट होणार आहे.
-डॉ. आनंद पाटील, वैद्यकीयअधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुसुंबी
०४पेट्री
फोटो : एकीव (ता. जावळी) येथील धबधब्यावर पर्यटकांच्या कोरोना तपासणी करताना डॉ. श्वेता पवार, मंडलाधिकारी संतोष मुळीक उपस्थित होते. (छाया : सागर चव्हाण)