संडे स्टोरी..
सचिन काकडे
कोरोनाला जात-पात, धर्म, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असं काहीही कळत नाही. कळतो तो फक्त निष्काळजीपणा. आपल्या या निष्काळजीपणामुळेच आज कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढू लागले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत कठीण असणार आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी आपल्याला निष्काळजीपणा सोडून शासन नियमांचे पालन करायला हवे, आपल्या सवयीत बदल करायला हवा, स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी.
सध्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीचा सामना करत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत; परंतु शासन नियमांचे आपण काटेकोर पालन करत नसल्याने कोरोनाचे साखळी तुटण्याचे नाव घेईना. याला केवळ नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरू लागला आहे. आपण कुठे चुकतोय, आपण काय करतोय आणि आपण काय करायला हवे, याचं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आली आहे.
कोरोनामुळे कोणाचे मातृछत्र हरपले तर कोणाचे पितृछत्र. कोणी आपल्या अत्यंत जवळचा व्यक्ती गमावला तर कोणी आख्खं कुटुंबच. अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये, असं आपल्याला वाटत असेल तर आपण कोरोनाला इतकं हलक्यात घेऊन चालणार नाही. आपल्याला निष्काळजीपणा सोडून स्वतःच्या सवयीत थोडा बदल करायला हवा. आपल्याला स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. संकटे येतील व जातील मात्र आपल्या जवळचा व आपल्या कुटुंबातील माणूस एकदा का आपल्याला सोडून गेला तर तो पुन्हा कधीच येणार नाही, याचे भान आपण ठेवायलाच हवे. कोरोनाच्या बाबतीत सातारा जिल्ह्याची परिस्थिती आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपली आहे. दररोज दोन ते अडीच हजार कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना उपचारासाठी बेडही मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. शासन आपल्यापरिने प्रयत्न करत असले तरी आपल्यालाही शासनाच्या प्रयत्नांना पाठबळ द्यायला हवे. ‘निष्काळजीपणा सोडा, कोरोना टाळा’ हे ब्रीद प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे.
(चौकट)
आपण इथं चुकतोय :
- गरज नसताना आपण घराबाहेर पडतोय.
- घरातल्या घरात व्यायाम करता येऊ शकतो तरीही रस्त्यावर मोकळ्या हवेत फिरायला जातोय.
- अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली आपण शहरभर भटकंती करतोय.
- फिजिकल डिस्टन्सचे आपण पालन करत नाही. मास्क केवळ नावापुरताच वापरतोय.
- ताप, थंडी, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी असे आजार आपण अंगावरच काढतोय.
- परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मग आपण कोरोना चाचणी करतोय.
- निर्धास्तपणे एकमेकांच्या घरात वावरतोय. बाहेरच्या व्यक्तींना घरी येण्याचे निमंत्रण देतोय.
- बाहेरून घरी आल्यानंतर स्वच्छ आंघोळ करत नाही.
- सॅनिटायझरचा वाप ही केवळ नावापुरताच करतोय.
(चौकट)
आपण हे करायला हवं :
- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला शासन नियमांचे पालन करायला हवं.
- मास्क घालणे, सतत हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टसिंग पाळून लोकांच्या संपर्कात जाणे टाळावे.
- कामावरून घरी येणाऱ्या व्यक्तींनी आपल्या सर्व वस्तू प्रथम सॅनिटाईज कराव्या. कुठेही हात न लावता सरळ स्नान करावे व कपडे धुण्यास टाकावे.
- बाहेरून आणलेली कोणतीही वस्तू, किराणा माल, भाजीपाला, फळे लगेच वापरू नका. काही काळ उन्हात ठेवा शक्य त्या वस्तू पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
- केवळ आरोग्य सेवेसाठी घराबाहेर पडावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- घरच्या घरीच अथवा गच्चीवर योगासन व व्यायाम करावा.
- घरातील कोणाला सर्दी, खोकला असा त्रास जाणवत असेल तर सर्व सदस्यांनी मास्कचा वापर करावा.
- शक्य तितका प्रवास टाळावा. गर्दी होईल, असे कार्यक्रम साजरे करु नये.
(कोट)
कोरोना रोखण्याची जबाबदारी खरंतर नागरिकांवर अधिक आहे. परंतु, कोणीच ही बाब गांभीर्याने घेत नाही. ‘मला काय होतंय’ या अविर्भावात जो-तो वावरत आहे. आपण जर नियमांचे पालन केले नाही तर आपले कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे.
- प्रा. सुधाकर शिंदे, वाई