वाई : वाई तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दि. १ मे पासून तालुक्यात कोरोनाचे नवे १ हजार ८६० रुग्ण आढळून आले असून, ३८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शासकीय व विविध खासगी रुग्णालयांत १ हजार १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दि. १ एप्रिलनंतर राज्यासह देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. कोरोनाची दुसरी लाट आल्याने परस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी परस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली. या संचारबंदीतही वाई तालुक्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण सुरूच होते.
वाई तालुक्यात एप्रिलमध्ये ३ हजार ५४२ रुग्ण आढळून आले, तर दि. १५ मे या कालावधीत १ हजार ८६० रुग्ण नवे रुग्ण आढळून आले असून, ३८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाल्याने तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(चौकट)
लसीकरणाला प्रतिसाद
जिल्ह्यासह वाई तालुक्यातही कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत वाई तालुक्यात ४५ वर्षांवरील २२ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर १८ ते ४४ वयोगटातील सुमारे एक हजार नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे.