संपूर्ण विभागाचे प्रवेशद्वार व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण म्हणून चाफळकडे पाहिले जाते. येथील समर्थ स्थापित श्रीराम मंदिरामुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या चाफळ गावासाठी स्वतंत्र अशी आरोग्य उपकेंद्राची इमारत नाही. शासनदरबारी केवळ उपकेंद्राची नोंद आहे. यापूर्वी देवस्थान ट्रस्टच्या जागेत हे उपकेंद्र सुरू होते. कालांतराने अपुरा कर्मचारीवर्ग व इमारतीची पडझड झाल्याने आरोग्य विभागाने येथील उपकेंद्र बंद केले. ते आजपर्यंत पुन्हा कधीच सुरू झाले नाही. चाफळपासून एक किलोमीटर अंतरावर शिंगणवाडी गावच्या रस्त्याकडेला प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे. त्याठिकाणी इमारत बांधताना ज्या जागेत इमारत व वॉल कंपाऊंड बांधले गेले आहे, त्याही जागेचा वाद सुरू आहे. तर दुसरीकडे फक्त दोनच आरोग्यसेविका विभागातील पन्नास वाडी वस्तीवर आरोग्यसेवा पुरवण्यासाठी उरलेल्या आहेत. त्यामुळे नेहमीच येथे आरोग्य विभागाची या-ना-त्या कारणाने पिछेहाट दिसून येते.
चाफळ आरोग्य उपकेंद्रासाठी जागा व निधी मिळवण्यात येथील नेतेमंडळी अपयशी ठरले आहेत. मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांनाही एक किलोमीटरची पायपीट करीत प्राथमिक आरोग्य केंद्र शोधत जावे लागत आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा वाद, उपकेंद्रासाठी इमारतीचा अभाव अशा अनेक समस्यांच्या गर्तेत चाफळचा आरोग्य विभाग गुरफटला आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व गावस्तरावर विविध पदे भूषविलेले प्रतिष्ठित ग्रामस्थ दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच शासनदरबारी मंजुरी असूनही इमारत नसल्यामुळे कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागाला शाळेचा आधार घेण्याची नामुष्की ओढवली आहे.
- कोट
वृद्धांची फरपट; गर्भवतींची पायपीट
चाफळ गावात आरोग्यसेवा पुरवण्यात स्थानिक प्रशासन व दोन्हीही गटाचे नेते अपयशी ठरले आहेत. याचा फटका स्थानिकांना बसत आहे. सन २००४ साली विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अस्वस्थ वाटू लागल्याने शंभूराज देसाई यांनाही थेट शिंगणवाडी आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे लागले होते. चाफळ गावात उपकेंद्र इमारत नसल्याने वयोवृद्धांसह गर्भवतींनाही पायपीट करत एक किलोमीटर अंतर चालत जावे लागत आहे.