कुडाळ : कोरोना परिस्थिती अजूनही थांबलेली नाही. महाराष्ट्रात दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. याकरिता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी योग्य सामजिक अंतर आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे.
याबाबत मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल माने व त्यांचे सहकारी यांनी बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारात नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करत मास्कचे वाटप केले.
कायदा व सुव्यवस्था राखत या कोरोना महामारीच्या काळात सामाजिक कर्तव्यासाठी पोलीस दल आघाडीवर राहिले आहे. आपल्या सुरक्षित आरोग्यासाठी वारंवार यांच्याकडून आरोग्य विभागाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. ‘मी आणि माझे कुटुंब’ या कोरोनापासून कायमच दूर राहण्यासाठी सर्वांनीच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आज नितांत आवश्यक आहे.
कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याने तालुक्यातील मेढा, कुडाळ, करहर आदी मुख्य ठिकाणच्या आठवडा बाजारात येताना लोकांनीही योग्य ती दक्षता घ्यायला हवी. व्यापारी वर्गानेही सामाजिक अंतराचे निकष पाळावेत, या उद्देशाने मेढा पोलिसांकडून कुडाळच्या आठवडा बाजारात कोरोना जनजागृती करण्यात आली.