सातारा : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाय राबविले जात असतानाच साताऱ्यातील संजय पातुरकर यांनी कवितांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांनी अनेक कविता रचल्या असून, सोशल मीडियाद्वारे त्यांची गेल्या वर्षभरापासून जनजागृती मोहीम सुरू आहे.
संजय पातुरकर यांचे मूळ गाव औरंगाबाद. एका संस्थेकडून साताऱ्यातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पातुरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे २०१७ पासून ते साताऱ्यात वास्तव्य करीत आहेत. आपल्या दैनंदिन कामाबरोबरच पातुरकर यांनी कविता करण्याचा छंदही लीलया जोपासला आहे. त्यांचा ‘शब्दबंध’ कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे.
कोरोनाचा काळ हा सर्वांसाठी कसोटीचा होता. अशा काळात संजय पातुरकर यांच्या कवितांंनी जनतेला मानसिक आधार दिला. आपण कुठे चुकतोय, आपल्याला काय करायला हवं आणि काय नको याची जाणीवही करून दिली.
‘कोरोनाचा उद्रेक आता पुन्हा पाहवत नाही. अनुभवातून आम्ही शहाणे होत नाही, पुढच्याला ठेच मागचा शहाणा.. ही म्हणही आम्ही पचवत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी नागरिकांच्या निष्काळजीपणावरही बोट ठेवले आहे. ‘बेसावध राहणे हे भूषण नाही.. बेफिकीर आम्ही सदैव तमा बाळगत नाही.. मास्क, सॅनिटायझर आम्ही सदैव बाळगत नाही.. कोरोना संपविण्याचा आम्ही विचारच करीत नाही,’ असे सांगत पातुरकर यांनी कोरोनो हद्दपार करण्यासाठी आता निष्काळजीपणा सोडा, असे आवाहनही केले आहे.
(कोट)
आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न मी पूर्वीपासूनच करीत आहे. कोरोनाकाळात नागरिक निष्काळजीपणे वागत होते. अशा नागरिकांना आपण कुठे चुकतोय व आपण काय करायला हवं, हे कवितांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला.
- संजय पातुरकर, सातारा
फोटो : ०१ संजय पातुरकर