पुसेगाव : शासनाचे नियम पायदळी तुडवत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पुसेगाव पोलीस प्रशासनाने चांगलाच पायबंद घातला आहे. या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात ही कारवाई सुरू असून विनामास्क तसेच विनाकारण घराबाहेर, दुचाकीवरून फिरणारे यांच्यावर कारवाई करत १ लाख ८१ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल केला.
दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी शासनाने केलेल्या कडक निर्बंधांनाही जनता पायदळी तुडवत आहे. पोलिसांचे हात बांधल्याने गेल्या आठवड्यात काहीच कारवाई करता आली नाही. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तसेच अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश किरदे यांच्या नेतृत्वाखाली पुसेगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक चेतन मछले, बाळासाहेब लोंढे, सचिन जगताप, ज्ञानेश्वर यादव, गणेश मुंडे, किरण देशमुख, सुनील अब्दागिरी यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या प्रत्येक गावामध्ये अशी कारवाई केल्याने लोकांच्यात कोरोनाबाबतीत जागृती होऊन १ लाख ८१ हजार ६०० रुपये दंडही वसूल केला.