कुडाळ : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परराज्य किंवा परजिल्ह्यातून जावळी तालुक्यात येणाऱ्यांना ७२ तास अगोदरचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. याबाबतचा आदेश जावळीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे यांनी काढला आहे.
शासनाने कोरोना प्रतिबंध रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू केला आहे. यामधील तरतुदीनुसार आदेश निर्गमित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळत आहेत. याचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. तसेच या संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जावळी तालुक्यात उद्भवू नये. याकरिता पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. कोरोनाबाबत कोणतीही काळजी न घेता परजिल्ह्यातून, परराज्यातून आपल्या मूळ गावी येत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
परराज्य किंवा परजिल्ह्यातून जावळी तालुक्यात येणाऱ्यांना ७२ तास अगोदरचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असेल तरच गावात प्रवेश दिला जाईल. ज्यांची कोरोना चाचणी झाली नसेल त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी व रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई करण्यात येईल.