खंडाळा : कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करीत जमावबंदी आदेश लागू असला तरीही लोकांना आंतरजिल्हा प्रवास करण्याची मुभा दिली आहे. सातारा जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हावासीयांची संख्या मोठी आहे. जिल्ह्याची सीमा ओलांडून येताना तपासणी नाक्यावर गर्दी होत होती. या ठिकाणी आता सामाजिक अंतराचे काटेकोर पालन केले जात आहे. रांगेतून येणाऱ्यांची नोंदणी करून तपासणी केली जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हजारो जिल्हावासीय पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यात अडकले आहेत. पुढील काळात आणखी अडचण होऊ नये, त्यामुळे प्रशासनाची परवानगी घेऊन सर्वजण जिल्ह्यात येत आहेत.
या सर्वांची जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ-शिंदेवाडी येथील तपासणी नाक्यावर नोंदी घेतल्या जात आहेत. तसेच सर्वांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात आहे. तसेच कोण कोणत्या तालुक्यात जाणार याची माहिती संकलित करावी लागत आहे.
त्यांच्या संगणकीय नोंदी घेण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडवले जात होते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबत दैनिक लोकमतने वृत्त प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
त्यानंतर आमदार मकरंद पाटील, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी भेट देऊन खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तहसीलदार दशरथ काळे यांनी अधिकच्या कर्मचारी पथकांची नेमणूक केली तसेच पोलिस प्रशासनाने दक्षता घेत कडक अंमलबजावणी केली. त्यामुळे येथील कामकाज सुरळीत व सुरक्षित सुरू झाले आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्यामुळे येथे गर्दी होत असली तरी पोलीस याबाबत दक्षता घेत आहेत. प्रशासनातील सर्व यंत्रणा त्यांच्यासाठीच राबत आहे. चेकपोस्टवर येणाऱ्या लोकांची नोंदणी व तपासणी होईपर्यंत त्यांना रांगेत उभे करून सोशल डिस्टन्सिंगबाबत विशेष काळजी घेतली जात आहे.- उमेश हजारे,पोलीस निरीक्षक, शिरवळ