सातारा: दोन दिवसांच्या दिलाशानंतर कऱ्हाडमध्ये आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला असून, एकट्या कऱ्हाडमध्ये ३९ रुग्ण बाधित आहेत. तर संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आता १२९ वर पोहोचला आहे. दरम्यान, ७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच १०४ जणांना नव्याने संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे.कऱ्हाडमध्ये गत दोन दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नव्हता. याउलट बरे होऊन रुग्ण घरी जात होते. त्यामुळे प्रशासनाबरोबरच कऱ्हाडकरांनाही मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, शनिवारी सकाळी आणखी एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धडधड वाढली.
पुणे येथून प्रवास करून आलेला युवक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालय २९, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कºहाड येथील २४, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील २ व ग्रामीण रुग्णालय वाई येथील ९ तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथील १० अशा एकूण ७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालय ४०, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे ६४ अशा एकूण १०४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १२९ झाली असून यापैकी कोरोना मुक्त होऊन ६१ जण घरी गेले तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. सध्या ६६ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.