सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शनिवारी आणखी दोघांना कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एका ५७ वर्षीय महिलेचा आणि ३५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. दरम्यान, इस्लामपूर येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या साताऱ्यातील दोघांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.सातारा जिल्ह्यातील एका ५७ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होत आहे तर पॅरिसहून प्रवास करुन आलेल्या ३५ वर्षीय युवकाला कोरडा खोकल्याचा त्रास होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दोघांनाही शनिवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे.
या दोन अनुदमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन.आय.व्ही.कडे पाठविण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.दरम्यान, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सातारा जिल्ह्यातील दोन निकट सहवासितांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.