खटाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता कोणालाही गृहविलगीकरणात ठेवले जाणार नाही. अशा कोरोनाबाधित व्यक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे. त्यातूनही एखादा रुग्ण घरीच राहिला, तर त्या रुग्णाच्या हातावर पोलीस दल व आशा सेविकांमार्फत शिक्के मारण्यात येतील, अशी माहिती पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खटावमध्ये ग्राम दक्षता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख राहुल पाटील, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे, राहुल जमदाडे, तैमुर मुल्ला, विशाल देशमुख, नम्रता भोसले, संजय देशमुख, कैसर मुल्ला, रमेश शिंदे, जुबेर शेख, सचिन जगताप, धनाजी भोसले उपस्थित होते.
संजय बोंबले म्हणाले, घरी होम क्वारंटाईन केलेले लोक पाच ते सात दिवसांत मला काही लक्षणे नाहीत, मी आता बरा आहे, मला काहीच त्रास नाही, असे सांगत घराच्या बाहेर पडून सुपरस्प्रेडरची भूमिका निभावत आहेत. प्रशासनाला, सरकारला दोष देत बसण्यापेक्षा आपण प्रशासनाला काय मदत करू शकतो, हा विचार करा. सरकार, प्रशासन त्यांच्या पातळीवर सक्षमपणे काम करीत आहेत. नागरिकांनीदेखील प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करायला हवे.
गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी आपला चौदा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी अलगीकरण कक्षात राहूनच पूर्ण करवा, असेही आवाहनही त्यांनी केले.
फोटो : 25 नम्रता भोसले
खटावमध्ये पार पडलेल्या ग्राम दक्षता कमिटीच्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी कमिटी सदस्यांना संचारबंदीबाबतच्या सूचना केल्या. (छाया : नम्रता भोसले)