लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकानेदेखील सुरू झाली. मात्र, नियमांचे उल्लंघन होऊ लागल्याने कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागलेला आहे. एका आठवड्यात तब्बल १४८ लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
राज्य शासनाने नव्याने निर्बंध घालून दिले आहेत. संपूर्ण राज्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यानुसार सर्वच प्रकारच्या आस्थापना या सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. शनिवार व रविवार हे दोन दिवस पूर्णत: संचारबंदी ठेवण्यात आलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत बाजारपेठेमध्ये ४ वाजेपर्यंत मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यातच लॉकडाऊनच्या अफवा पसरत असल्याने बाजारपेठेत लोकांची खरेदीसाठी झुंबड उडताना पाहायला मिळते.
दुकाने सुरू झाल्यानंतरच २५ जून २६ जूननंतर पॉझिटिव्हिटी दर साडेआठ टक्के झाला. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत १२ टक्के वाढ दिसते. रुग्णसंख्या कमी होत नसल्याने जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू होऊ शकतात. आरटीपीसीआर चाचणीचा निकष लावला तर सातारा जिल्हा हा चौथ्या टप्प्यातच आहे. लोकांनी काळजी घेतली नाही तर कोरोनाची लाट पुन्हा उसळू शकते, हे लक्षात घ्यायला हवं.
दोन आठवड्यांपासून सुरू झाली दुकाने
जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यानुसार प्रशासनाने निर्बंध उठवले आहेत. एप्रिल, मे या महिन्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन केल्याने व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट आले होते. या दोन्ही महिन्यांमध्ये जिल्ह्याची रुग्णवाढ मोठी होती. दिवसाला २२०० रुग्ण येत होते. तेव्हा लॉकडाऊन केला होता. दोन आठवड्यांपासून निर्बंध शिथिल केले, दुकाने उघडली. मात्र, रुग्ण वाढू लागले असल्याने निर्बंधांचा फटका व्यापारी बांधवांना बसू शकतो.
कोट..
राज्य शासनाने २५ जूनचा शासन आदेश काढला. त्यानुसार आरटीपीसीआरचा दर पाहून कुठल्या स्तरातील निर्बंध ठेवायचे हे ठरणार आहे. आरटीपीसीआर दर १२ टक्क्यांवर आहे. यात वाढ दिसली तर शुक्रवारी सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आपत्ती निवारण समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.
शेखर सिंह, जिल्हाधिकारी
हे करा...
दुकानांत गर्दी होऊ द्यायची नाही
लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जायचे नाही
मास्क न वापरणाऱ्यांना वस्तू द्यायच्या नाहीत
सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांना दुकानाबाहेर काढायचे
खते, बी-बियाणे दुकानांवरही गर्दी हाेते, तिथे बॉक्स आखावेत
पॉइंटर्स
अशी वाढली आठवड्यातील रुग्णसंख्या
२३ जूनला ८३० रुग्ण सापडले, पॉझिटिव्हिटी दर ७.२ टक्के, २४ जूनला ८७९ रुग्ण तर ८.२० पॉझिटिव्हिटी, २५ जूनला ८१४ रुग्ण अन् पॉझिटिव्हिटी ८.२६ टक्के, २६ जूनला १ हजार ५ रुग्ण अन् ९.७५ टक्के पॉझिटिव्हिटी, २७ जूनला ९७७ रुग्ण, २८ जूनला ४९७ रुग्ण तर ७.६४ टक्के पॉझिटिव्हिटी, २९ जूनला ७८० रुग्ण तर ९.०७ टक्के पॉझिटिव्हिटी, ३० जून रुग्ण ८०४, पॉझिटिव्हिटी ७.५१ टक्के.