लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून अनेकांचे केवळ धक्क्यानेच मृत्यू होत आहेत. त्यामुळे या रुग्णांना खरंतर मानसिक आधाराची गरज असून यावर उपाय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आता सर्व बाधित रुग्णांना मानसिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही डॉक्टरांकडून व्यक्त केली जाते आहे.
जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. लस उपलब्ध झाल्याने लोक निर्धास्त झाले होते. मात्र, तरीही मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे सावट आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण हबकून जात आहेत. परिणामी रुग्णांची प्रकृती खालावत जात आहे. आपल्या आजूबाजूचे लोक दगावत असल्याचे माहीत होत आहे. त्यामुळे बाधित रुग्ण आणखीनच दहशतीखाली जातोय. हे सध्या सुरू असलेल्या मृत्यूच्या तांडवातून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून या बाधित रुग्णांना मानसिक बळाची गरज असल्याचे समोर आले. त्यामुळे या बाधित रुग्णांना जर रोजच्या रोज त्यांच्याशी जाऊन पॉझिटिव्ह विचार सांगून तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात. तुम्हाला काहीही झाले नाही. तुमचे सर्व रिपोर्ट चांगले आहेत, असा धीर दिल्यानंतर आणखीनच त्यांना बळ येईल. रुग्णाच्या मनातील भीती कमी करण्याचा उद्देश डॉक्टरांचा आहे. एकीकडे कोरोनाबाधितावर औषधोपचार सुरूच राहणार आहेत. मात्र, त्याचबरोबर हे मानसिक बळ जर बाधित रुग्णाला दिले तर तो या धक्क्यातून सावरेल. शिवाय त्याच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन इतर रुग्णांमध्येही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हा अनोखा उपक्रम या धकाधकीच्या वेळेतही राबवणार आहेत.
यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची टीमही यामध्ये सक्रिय राहणार आहे. तसेच इतर डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही जास्तीत-जास्त कोरोनाबाधितांसोबत चर्चा करणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्यांना काय हवं आहे ते देणे, औषधोपचार वेळेवर करणे यासह त्यांचे मानसिक संतुलन चांगले राहील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेवढ्या रुग्णांपर्यंत पोहोचता येईल तेवढ्या रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून या बाधित रुग्णांना मानसिक आधार जर मिळाला तर यातूनही ते सहीसलामत सुखरूप घरी जावेत, यासाठी हा डॉक्टरांचा अनोखा लढा यापुढे सुरू राहणार आहे.
चौकट : कोरोना रिपोर्ट आल्यानंतर अनेकजण घाबरून जात आहेत. मात्र, घाबरण्याचे काही कारण नाही. आपले मानसिक संतुलन ढळून द्यायचे नाही. आपण खंबीर आहोत, हे मनाला ठणकावून सांगितले पाहिजे. हे बाधित रुग्णांना पटवून देण्यासाठी आता आमची टीम सज्ज झाली आहे.