सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण अजूनही कोरोनाची चाचणी करीत नसल्याचे समोर येत आहे. लक्षणे असूनदेखील कोरोना चाचणी न करणे हे चुकीचे आहे. नागरिकांनी लक्षणे अंगावर न काढता तत्काळ चाचणी करून डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात १०९१ इतके कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. मागच्या वर्षीचा उच्चांक १११७ उच्चांक १५ सप्टेंबरला होता. आपण त्याचे जवळपास पोहोचतो आहोत. कोरोनाशी लढा देण्यासाठी कोरोनाचे लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. आपण लवकरात लवकर रुग्णाला तपासून त्याची चाचणी करून घेतली आणि उपचार लवकर सुरू झाले तर पेशंटला वाचवून घेण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो.
अनेकदा पेशंट असूनसुद्धा अंगावर काढत आहेत. लवकर निदान करून घेतले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. खोकला आहे, घसा दुखतोय, ताप आहे किंवा वास येत येत नाही तर जवळच्या डॉक्टरना दाखवा. काही लोकांना डायरियाचा प्रॉब्लेम असायचा आणि त्यानंतर कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत होती. तुमच्या फॅमिली डॉक्टरना दाखवून तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला कोरोना चाचणीची गरज आहे किंवा नाही. चाचणी न करता घरामध्ये बसून राहू नका. थकवा जाणवत असेल तरी घरात बसून राहू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.आयुष मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार आयुर्वेदिक उपचार पद्धतीसुद्धा लोक घरच्या घरी घेऊ शकतात. काढा, पाणी हळदी आणि मीठ टाकून गुळण्या करा. आपल्या घरामध्ये पूर्वीपासून ज्या पारंपरिक उपचार पद्धती केल्या जात होत्या, त्यांचा आधारदेखील लोकांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.