वाई : कोरोना संकटावर मात करण्यासाठी वाई नागरपालिकेने आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शहरातील चौकाचौकांत जात नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सुमारे १५० व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शहरातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक बाबींची तसेच इतरही दुकाने नियम व अटीचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी आहे. वाई पालिकेने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून कोरोना चाचणी मोहीम सुरूच ठेवली आहे. कोरोना प्रसार टाळण्यासाठी पालिकेने रविवारीही ठिकठिकाणी रॅपिड अँटिजेन चाचणी मोहीम राबवली.
नगरपालिका कर्मचारी, पोलीस व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. मास्क न घालणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या व्यक्ती तसेच नियम न पाळणाऱ्या दुकानदार व कामगारांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तर चाचणीत बाधित आढळल्यास थेट कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येत आहे. यासाठी वाई पालिकेची रुग्णवाहिका पथकासोबतच ठेवण्यात आली आहे.
याशिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणारे व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेची दोन स्वतंत्र पथके शहरात नियुक्त करण्यात आली आहेत. तर रिक्षाच्या माध्यमातूनही नागरिकांत कोरोनाविषयक जनजागृती करण्यात येत आहे.
कोट :
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वाई शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. बँका, दुकाने, भाजी मंडई, पतसंस्था तसेच शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी आढळल्यास तेथील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये बाधित आढळल्यास संबंधितांना कोरोना सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे.
- विद्या पोळ, मुख्याधिकारी, वाई नगरपालिका
फोटो दि.२७वाई पालिका फोटो...
फोटो ओळ : वाई शहरात नगरपालिकेच्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. (छाया : पांडुरंग भिलारे)
\\\\\\\\\\\\\\\\\\\